मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ हजारो समाज बांधव मुंबईला रवाना; बारामती शेकडो वाहनांनी गजबजली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 05:17 PM2024-01-24T17:17:32+5:302024-01-24T17:22:59+5:30
बारामती तालुक्यातून मराठा क्रांती मोर्चामध्ये सकल मराठा बांधव आज सकाळी कसबा येथे भल्या सकाळीच एकत्रित आले...
बारामती (पुणे) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हजारो समाजबांधव बुधवारी(दि २४) रवाना झाले. बारामती तालुक्यातून मराठा क्रांती मोर्चामध्ये सकल मराठा बांधव आज सकाळी कसबा येथे भल्या सकाळीच एकत्रित आले. सकाळी नऊ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापच, कोण म्हणतंय देत नाय घेतल्याशिवाय राहत नाय, अशा घोषणांनी अवघा परीसर दुमदुमला.
कसबा येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथुन बारामती शहरातील समाज बांधव व तालुक्यातील गाव, वाडी, वस्ती वरुन साधारण सुमारे १५०० चारचाकी वाहनातून दहा हजार समाजबांधव रवाना झाले. यामध्ये युवकांसह ज्येष्ठ, महिलांचा समावेश होता.
आंदोलनातील सर्व चारचाकी वाहने अडथळा होवू न देण्याची दक्षता घेत शिस्तबध्दतेचे दर्शन घडविले. भवानीनगर येथुन शेकडो समाजबांधव दुचाकी रॅली काढत यावेळी पोहचले.तसेच हजारोंच्या संख्येने मराठा बांधव, भगिनी, वृद्ध आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी उत्साहाने पायी निघाले आहेत.
आंदोलक मोरगाव मार्गे पुणे देहुरोड येथे पोहचणार आहेत. त्यानंतर सर्व मुंबइच्या दिशेन निघणार आहेत. आंदोलनाला येणाऱ्या सर्व समाज बांधवांच्या जेवणाची व्यवस्था व वैद्यकीय प्रथमोपचाराची सोय मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येणार आहे. मनोज जरांगे यांच्या सूचने नुसार आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे. तसेच बारामती तालुक्यातील आंदोलक जरांगे पाटलांच्या आदेशा शिवाय आंदोलन ठिकाणा पासून परत येणार नाहीत, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगितले.