Pune News| स्वत:च्या घरात राहणाऱ्या पुणेकरांना कराचा हजारो रुपयांचा भुर्दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 04:21 PM2022-01-26T16:21:01+5:302022-01-26T16:24:46+5:30
४५ टक्के सवलतींसह गेल्या ५२ वर्षांपासून मिळकत कर भरणाऱ्यांना यामुळे भुर्दंड बसणार
निलेश राऊत
पुणे : स्वत: च्या घरात राहत असलेल्यांवर कराचा बोजा पडणार आहे. महापालिकेने मिळकत करात दिलेली ४५ टक्के सवलत १ एप्रिल, २०१८ पासून बंद केल्याने सुमारे ८० हजार मिळकत धारकांना महापालिकेच्या मिळकत कर विभागाने पूर्ण मिळकत कर भरण्यासाठी नोटिसा बजावल्या गेल्या आहेत़. ४५ टक्के सवलतींसह गेल्या ५२ वर्षांपासून मिळकत कर भरणाऱ्यांना यामुळे भुर्दंड बसणार आहे.
शहरात सध्या ५०० चौरस फुटापर्यंतची मिळकत असलेल्या व स्वत: घरमालकच त्या मिळकतीत राहत असेल त्याला यापूर्वी (ज्या सालचे घर त्या सालचा मिळकत कर या धोरणानुसार) वेगवेगळ्या विभागानुसार दरवर्षी अंदाजे ४ हजार रूपये मिळकत कराची रक्कम वाढली गेली आहे़. ज्यांना वर्षाला दहा हजार रूपये मिळकत कर येत होता त्यात साडेचार हजार रुपये वाढणार आहे. ही रक्कम शहरातील विविध भागानुसार व मिळकतीच्या आकारानुसार कमी जास्त प्रमाणात आहे़
पाचशे चौरस फुटाचे घर असलेल्यांना १५ ते १८ हजार रुपये वाढणार
सवलतीशिवाय मिळकत कराच्या रकमेची मागणी १ एप्रिल, २०१८ पासून करण्यात आल्याने ज्यांना मिळकत कराच्या पावत्या गेल्या आहेत त्यांना साधारणतः ५०० स्वेअर फुटामागे १५ ते १८ हजार रूपये वाढले गेले आहेत़ अनेकांनी महापालिकेत या वाढीव मिळकत कराच्या रकमा का आल्या, त्या कमी करून द्या म्हणून अर्जही केले आहेत़ परंतु , राज्य शासनाच्या आदेशानुसारच ही सवलती शिवायची मिळकत कर आकारणी करण्यात येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.