एक डुक्कर पकडण्यासाठी हजार रुपये

By admin | Published: June 22, 2017 06:58 AM2017-06-22T06:58:31+5:302017-06-22T06:58:31+5:30

शहरातील, विशेषत: उपनगरातील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याचे काम महापालिकेकडून एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे.

Thousands of rupees to catch a pig | एक डुक्कर पकडण्यासाठी हजार रुपये

एक डुक्कर पकडण्यासाठी हजार रुपये

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील, विशेषत: उपनगरातील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याचे काम महापालिकेकडून एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. एक डुक्कर पकडण्यासाठी त्या संस्थेला ९१३ रुपये दिले जाणार असून, एकूण ४८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आली.
मोकाट डुकरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सहन करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डुकरांचा बंदोबस्त करण्याचे काम मयूर पिगरी फार्म या संस्थेला देण्यात आले आहे. या संस्थेकडून पकडण्यात आलेल्या डुकरांचा लिलाव करून ती कत्तलखान्यांना विकली जाणार आहेत.
नवी मुंबई महापालिकेने डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती आरोग्य विभागाने घेतली होती. त्यांच्याकडे खासगी संस्थांमार्फत डुकरे पकडून ती लिलावाद्वारे विकली जात होती. यामुळे डुकरांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात नवी मुंबई महापालिकेला यश आले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात ही प्रायोगिक तत्त्वावर खासगी संस्थेकडे डुकरांना पकडण्याचे काम देण्यात आले आहे.
महापालिका प्रशासनाकडून मोकाट डुकरांच्या नियंत्रणाचे काम वर्षभरासाठी खासगी संस्थेला देण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये मयूर पिगरी या संस्थेकडून कमी रकमेची निविदा सादर करण्यात आली आहे.
या निविदेत एक डुक्कर पकडण्यासाठी ९१३ रुपये दर नमूद केला आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात मोकाट डुकरांच्या बंदोबस्तासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार मोकाट डुकरांच्या नियंत्रणाचे ४८ लाख रुपयांचे काम वर्षभरासाठी संबंधित खासगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव आरोग्य खात्याने स्थायी समितीसमोर ठेवला होता, त्याला मान्यता देण्यात आली आहे.

Web Title: Thousands of rupees to catch a pig

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.