अपघातांमुळे वर्षभरात हजार विद्यार्थ्यांचा मृत्यू; सुरक्षेचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:33 AM2019-11-12T05:33:53+5:302019-11-12T05:33:57+5:30
दरवर्षी राज्यातील शाळांमधील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचा अपघाताने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे : दरवर्षी राज्यातील शाळांमधील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचा अपघाताने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने वाहन अपघात, पाण्यात बुडून आणि साप चावल्याने हे मृत्यू होत आहेत. त्यामुळे सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी, या बाबतच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहेत.
राज्य शासनातर्फे काही वर्षांपासून अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ राबविली जात आहे. पूर्वी खासगी विमा कंपनीमार्फत अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुंटुंबियांना या योजनेंतर्गत आर्थिक मदत केली जात होती. अपघातामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना २०११ पासून शासनाने ७५ हजार रुपयांचा निधी देण्यास सुरूवात केली. अपघाताच्या तीव्रतेनुसार विद्यार्थ्यांना ५० ते ३० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. शासनातर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात १ हजार ६९ तर २०१८-१९ या वर्षात १,१९० अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. त्यातील ८० टक्के विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर २० टक्के विद्यार्थ्यांना अपघात झाल्याने त्यांना अपंगत्व आले.
अपघातामुळे मृत्यू होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने नुकतीच पुण्यातील गटशिक्षण अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात सर्व शाळांनी विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष द्यावे, अशा सूचना करण्यात आल्या. अपघातामध्ये दोन डोळे किंवा दोन्ही गेल्यामुळे अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये तर एक डोळा किंवा हात निकामी झाल्यास विद्यार्थ्यांला ३० हजार रुपये अनुदान दिले जाते. रस्त्यावरील अपघातामुळे मृत्यूमुखी पडणाºया विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शाळांनी रस्त्याचे नियम, पाणी, साप आदींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी, अशा सूचनाही प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत.