मूठभरांच्या सोयीसाठी हजारो वृक्षांचा बळी
By admin | Published: November 26, 2015 01:11 AM2015-11-26T01:11:02+5:302015-11-26T01:11:02+5:30
दुतर्फा हजारो वृक्ष असणारा, भर उन्हातही थंडगार सावली देणारा रस्ता उखडून तो भकास करण्याचा घाट ‘स्मार्ट सिटी’ होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पुणे महापालिकेने घातला आहे.
पुणे : दुतर्फा हजारो वृक्ष असणारा, भर उन्हातही थंडगार सावली देणारा रस्ता उखडून तो भकास करण्याचा घाट ‘स्मार्ट सिटी’ होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पुणे महापालिकेने घातला आहे. नव्याने निर्माण होत असलेल्या वसाहतीमधील काही बड्या लोकांच्या सोयीसाठी, या देखण्या रस्त्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रस्त्यावरच्या हजारो वृक्षांचा बळी तर जाईलच; शिवाय टेकडीच्या पायथ्याचा काही भाग व तिथे लावलेल्या आणखी काही वृक्षांचीही कत्तल होण्याची चिन्हे आहेत. ‘स्मार्ट सिटी’मध्ये हिरवाईला महत्त्व असताना नेमका त्याच्या उलट प्रकार करण्याच्या, या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध सुरू केला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा शेजारच्या वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ को-आॅपरेटिव्ह मॅनेजमेंट (वॅमनीकॉम) रस्त्यावर पालिकेने हे गंडातर येऊ घातले आहे. ही सगळी जागा विद्यापीठाची, त्यांनी ती वॅमनीकॉम संस्थेला दिली. संस्थेने ती विकसित केली. अंतर्गत रस्त्यावर हजारो वृक्ष लावून, जोपासून दृष्ट लागावी अशी सुंदर केली. ते पाहून संस्थेच्या आवारातील एक टेकडीही विद्यापीठाने संस्थेला विकसित करण्यासाठी दिली. स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागाने ही वैराण टेकडीही हिरवीगार झाली. इतकी की तिथे आता काही मोर वस्तीला आले आहेत.
या परिसरापासून दूरवर नव्याने निर्माण होत असलेल्या वसाहतीमधील काही बड्या लोकांच्या सोयीसाठी या देखण्या रस्त्यावर घाला घालायचा निर्णय पालिकेने घेतला आहे. संस्थेच्या प्रवेशद्वारापासून सुरू होणारा रस्ता विद्यापीठाच्या औंध रस्त्यावरील जोशी गेटपर्यंत जातो. तिथून पुढे तो हॅरिस ब्रिजपर्यंत आहे. मधला लष्कराच्या मालकीचा काही भाग वगळता, अन्य परिसरात आता नव्याने वसाहती होत आहेत. त्यांना वाहतुकीला सोयीचे व्हावे, यासाठी या रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यात या रस्त्यावरच्या हजारो वृक्षांचा बळी तर जाईलच; शिवाय टेकडीच्या पायथ्याचा काही भाग व तिथे लावलेल्या आणखी काही वृक्षांचीही कत्तल होण्याची चिन्हे आहेत.
मूळ रस्ता विद्यापीठाचा, तो कराराने ‘वॅमनीकॉम’कडे आलेला, पालिकेचा त्याच्याशी काहीही संबंध नाही; मात्र तरीही पालिका या रस्त्यावर हक्क दाखवित, त्यावरच्या
वृक्षसंपदेवर कुऱ्हाड चालविण्याचा विचार करीत आहे.
रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या आयसीएस कॉलनी व भोसलेनगरमधील सुमारे ३ हजार कुटुंबांनी पालिकेच्या या तुघलकी निर्णयाचा प्रतिकार करण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने लढा देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी ‘मोहल्ला समिती’ स्थापन केली आहे. एकही झाड तोडू देणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे; मात्र पालिका त्यांचे काहीही ऐकायला तयार नाही.
(प्रतिनिधी)
पुणे होणार सिमेंट काँक्रिटचे जंगल
पुणे : पुणे शहर जुन्या हद्दीचा विकास आराखडा सरकारकडून मंजूर होण्याची वेळ आल्यानंतरही त्यावरची टीका अद्याप सुरूच आहे. या विकास आराखड्यात नव्या बांधकामांना मुक्त वाव दिल्यामुळे, येत्या काळात पुणे म्हणजे, सिमेंट काँक्रिटचे जंगल होण्याची भीती असल्याचे ग्रीन मुव्हमेंट या संस्थेने म्हटले आहे. याबाबत संस्थेच्या वतीने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात या विकास आराखड्यावर; तसेच तो आहे तसा मंजूर होऊन अमलात आला, तर होणाऱ्या दुष्परिणामांवर चर्चा झाली. खासदार वंदना चव्हाण, हेमंत चव्हाण, अनिता गोखले-बेनिंजर, विवेक वेलणकर, दीपक बीडकर, सुजित पटवर्धन, डॉ. विजय परांजपे, सारंग यादवाडकर, अनघा घैसास, रणजित गाडगीळ आदी या बैठकीला उपस्थित होते.
नव्या इमारतींमधील सदनिका विक्रीविना पडून असताना, नव्या बांधकामाला परवानगी कशासाठी, असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला. मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंना ४ एफएसआय देण्यामुळे उंच इमारती उभ्या राहून पुण्याचा मूळ चेहरा बदलून जाईल, अशीही टीका करण्यात आली. संस्थेच्या वतीने या आराखड्याच्या विरोधात नागरिकांची चळवळ उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर प्रशासकीय स्तरावरही आराखडा अमलात येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
निकटचे संबंध असलेल्या व्यावसायिकांच्या दबावातून पालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रस्तारुंदीकरणाचा घाट घातला गेला असल्याची चर्चा आहे. रस्तारुंदीकरणासाठी काही आर्थिक तरतूदही केली असल्याचे समजते. जोशी गेटकडून वॅमनीकॉम संस्थेच्या गेटपर्यंतचा रस्ता आधी करून, नंतर वॅमकॉम ते वैकुंठ मेहता प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता तयार करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. पालिका हद्दीतील एक वृक्ष पाडायचा असला, तरी तो विषय पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीसमोर येतो. इथे इतके वृक्ष पाडणार असूनही अद्याप हा विषय पालिकेने समितीसमोर ठेवलेला नाही, असे समितीचे सदस्य अमेय जगताप यांनी सांगितले. विषय आल्यानंतर त्याला सर्वांत पहिला विरोध आपला असेल, असे ते म्हणाले.