हजारो आदिवासी विद्यार्थी आरोग्यसेवेपासून वंचित; १३०० पेक्षा अधिक मुलांचे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 08:18 PM2020-03-03T20:18:11+5:302020-03-03T20:23:53+5:30

आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे सर्पदंश, आजारपण, अपघात, पाण्यात बुडून, आकस्मिक व इतर अन्य कारणाने जवळपास १३०० पेक्षा अधिक मुलांचे मृत्यू

Thousands of tribal students are deprived of healthcare | हजारो आदिवासी विद्यार्थी आरोग्यसेवेपासून वंचित; १३०० पेक्षा अधिक मुलांचे मृत्यू

हजारो आदिवासी विद्यार्थी आरोग्यसेवेपासून वंचित; १३०० पेक्षा अधिक मुलांचे मृत्यू

Next
ठळक मुद्देआश्रमशाळा आरोग्य तपासणी पथक निष्क्रिय मागील आठ महिन्यांपासून बंद असलेले आश्रमशाळा आरोग्य तपासणी पथक कार्यान्वित

पुणे : घोडेगाव तालुक्यातील (आंबेगाव जि.)ग्रामीण रुग्णालयाच्या अखत्यारित असलेले आश्रमशाळा आरोग्य तपासणी  पथक अवघ्या एका दिवसाचा फिरती अहवाल मागील आठ महिने सादर करीत आहे.आदिवासी विद्यार्थींसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यान्वित करण्यात आलेली पथके आदिवासी आश्रमशाळांची तपासणी करण्याचे काम करीत नसल्याचा आरोप आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते रवींद्र उमाकांत तळपे यांनी केला आहे.
घोडेगाव कार्यक्षेत्रात १० शासकीय आश्रमशाळा,३ अनुदानित आश्रमशाळा व १४ शासकीय वसतीगृहे अशा एकून २७ आश्रमशाळांचा समावेश आहे.तसेच शासकीय आश्रमशाळेत ३३०७, अनुदानित आश्रमशाळेत ११३६ व शासकीय वसतीगृहात ८१० असे एकूण ५२५३ विद्यार्थी आहेत.तसेच पथकाने २३ दिवस फिरती करणे आवश्यक आहे. मात्र तपासणीचे काम योग्य पद्धतीने केले जात नाही.मागील आठ महिन्यांपासून बंद असलेले आश्रमशाळा आरोग्य तपासणी पथक कार्यान्वित करुन पुणे जिल्हातील आश्रमशाळा व वसतीगृहातील हजारो विद्यार्थ्यांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. आदिवासी विकास मंत्री अँड.के सी पाडवी यांना दिलेल्या पत्रात ही मागणी करण्यात आली आहे.
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे सर्पदंश, आजारपण, अपघात, पाण्यात बुडून, आकस्मिक व इतर अन्य कारणाने जवळपास १३०० पेक्षा अधिक मुलांचे मृत्यू झालेले आहेत. असे दुर्देवी प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसेच आश्रमशाळा सुधारण्यासाठी कठोर नियम बनवावेत अशी मागणी करणारी याचिका मी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यामुळे आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी ३७ नियमित पथकांची एकूण मंजूर पदसंख्या १४८ करुन या पदांना शासनाने कायमस्वरुपी मान्यता दिली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत ३७ आश्रमशाळा पथकामार्फत आश्रमशाळा विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येते, असे रवींद्र उमाकांत तळपे यांनी सांगितले.
आश्रमशाळा आरोग्य तपासणी पथकाचे वैद्यकीय अधिकारी, गट अ मंजूर असूनही २४.७.२०१९ पासून हे पद रिक्त आहे.सदर वैद्यकीय अधिकारी यांनी राजीनामा दिल्याने हे पद भरण्यात आलेले नाही किंवा या पदाचा पदभार कोणाकडेही देण्यात आलेला नाही. सहा. परिचारिका, औषध निर्माता व वाहने चालक ही पदे भरलेली असूनही तपासणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याचे मागील सहा महिन्यांपासून शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व शासकीय वसतीगृहातील हजारो विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली नाही. तसेच पथकाला २१ वषापूर्वीचे वाहन देण्यात आले असून, ते वारंवार दुरुस्ती करावे लागत आहे. याबाबतचा प्रस्ताव परिवहन उपसंचालक, पुणे यांना पाठविण्यात आलेला आहे. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.  ज्यामुळे हजारो आदिवासी विद्यार्थी आरोग्य सुविधेपासून वंचित असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Thousands of tribal students are deprived of healthcare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.