काम देण्याच्या बहाण्याने हजारो महिलांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 02:15 AM2018-12-18T02:15:56+5:302018-12-18T02:16:17+5:30
राज्यभरात जाळे : वर्ल्ड ट्रस्ट डाय मनी संस्थेवर पुण्यात गुन्हा दाखल
पुणे : महिला गट स्थापन करून कापडी पिशव्या बनविण्याचे काम देण्याच्या बहाण्याने सदस्य फीच्या नावाखाली पैसे गोळा करून दिलेल्या मालाचे पैसे न देता वर्ल्ड ट्रस्ट डाय मनी संस्थेने राज्यभरात हजारो महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. पुण्यातही आतापर्यंत १ हजार महिलांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली आहे़
कंपनीचा चेअरमन मनीष लोकरस, त्याच्या सहायक जयश्री कोपर्डेकर व सुनीता दास अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़ हा प्रकार जून ते २० नोव्हेंबर २०१८ दरम्यान घडला आहे़ महिलांनी कामाच्या आशेने ६५१ रुपये भरले; पण तयार केलेल्या पिशव्या कंपनीला पाठविल्यानंतरही पैसे मिळत नसल्याचे पाहून जयश्री कोपर्डेकर, मनीष लोकरस यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. कार्यालयही बंद केल्याने लोकांचा संशय वाढला़
कात्रज येथे मनीष लोकरस याने वल्ड ट्रस्ट डाय मनी संस्थेचे कार्यालय सुरू केले होते़ महिलांना तुम्ही गट स्थापन करा़ आम्ही कागदी व कापडी पिशव्या, अगरबत्ती, मेणबत्ती व द्रोण तयार करण्यासारखे गृहउद्योग सुरू करून देऊ़ कच्चा मालाचा पुरवठा करून व तुमच्या वस्तूही घेऊ असे सांगितले़ सभासद फी म्हणून ६५१ रुपये घेतले. काही महिलांना ‘आमच्याकडे पैसे गुंतवा, तुम्हाला कमी कालावधीमध्ये जास्त पैसे मिळवून देतो, आकर्षक व्याज देतो,’ असे सांगून रोख स्वरूपात २० हजार, ३० हजार रुपये घेतले़ त्याची कोणतीही पावती दिलेली नाही़ महिलांच्या एका १५० जणींच्या गटाने प्रत्येकी ६५१ रुपये प्रमाणे ९७ हजार रुपये दिले़ महिलांनी केलेल्या कामाचा पगार न देता व उलट गुंतविलेली अंदाजे १ लाख ६५० रुपये परत न करता महिलांची फसवणूक केली़ गटप्रमुखांना त्याने ‘तुम्ही कच्चा माल तयार करण्यासाठी सुरुवातीला पैसे टाका़ तुम्ही पिशव्या बनविल्या, की त्याच्याबरोबर तुमचे पैसे देतो,’ असे सांगितले होते़ त्याप्रमाणे गटप्रमुख महिलांनी स्वत: पैसे गुंतवून पिशव्या, मेणबत्त्या तयार केल्या़ त्या त्यांनी वर्ल्ड ट्रस्ट डाय मनीच्या कार्यालयात नेऊन दिल्या़; पण त्याचे पैसे त्याने दिले नाही़
कर्जत, यावल, कराड येथे गुन्हे
४मनीष लोकरस याने राज्यभरात विविध ठिकाणी कार्यालये उभारून सुमारे ४५ हजार महिलांकडून ६५१ रुपये सभासद फी म्हणून रोख स्वरूपात गोळा केली आहे़ कर्जत, यावल, कराड येथे आतापर्यंत गुन्हे दाखल केले आहेत़
४कर्जत पोलिसांनी यापूर्वी जयश्री कोपर्डेकर यांना अटक केली होती; परंतु त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे़ त्यानंतर मुख्य सूत्रधार मनीष लोकरस याला सांगलीतून अटक केली आहे़
४न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली असून त्यानंतर त्याला अटक करण्यात येणार असल्याचे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी सांगितले़