पितृत्वाच्या ओढीला हवाय मायेचा धागा
By admin | Published: June 15, 2014 03:50 AM2014-06-15T03:50:31+5:302014-06-15T03:50:31+5:30
प्रत्येक पुरुषात एक स्त्री आणि प्रत्येक स्त्रीत एक पुरुष असतो, असे म्हटले जाते, त्यामुळे एक पिता आईचीही भूमिका पार पाडू शकतो,
पुणे : प्रत्येक पुरुषात एक स्त्री आणि प्रत्येक स्त्रीत एक पुरुष असतो, असे म्हटले जाते, त्यामुळे एक पिता आईचीही भूमिका पार पाडू शकतो, या सकारात्मक विचारातून आपल्या एकाकी जीवनाच्या सफरीत तान्हुलं सोबती मिळविण्यात पुुरुषांचा पुढाकार वाढत आहे.
बदलत्या काळात ‘सिंगल पॅरेंट’ ही संकल्पना वेगाने समोर येताना दिसत आहे. घटस्फोटित किंवा करिअरच्या मागे धावताना, काही जबाबदाऱ्यांमुळे विवाहाचा बंध नको वाटणाऱ्या स्त्री-पुरुषांना आयुष्याच्या एका टप्प्यावर सोबतीची गरज भासते. मात्र, ही ओढ जोडीदाराची नसून आपलं मूल असावं, अशी असते. अशाच या पालकत्वाच्या ओढीने एकटी स्त्री किंवा पुरुष मूल दत्तक घेतात. स्त्रीतील मातृत्वाची भावना ओळखून ‘सिंगल मदर्स’ तुलनेने अधिक आढळतात; परंतु एक पुरुषही उत्तम पिता व चांगली माता अशा दोन्ही भूमिका बजावू शकतो, असा विश्वास थोड्या प्रमाणात वाढत गेल्याने ‘सिंगल फादर’ही समोर येत आहेत. हे शहरातील अनाथालयांमध्ये एकट्या पुरुषांकडून मूल दत्तक घेण्याच्या मागणीवरून स्पष्ट होत आहे.
पुण्यात अनाथ मुलांसाठी भारतीय समाजसेवा केंद्र काम करते. गेल्या काही वर्षांत या केंद्रात एकट्या पुरुषांकडून मूल दत्तक घेण्याची मागणी वाढल्याचे चित्र आहे. याबाबत या केंद्राच्या वर्षा भागवत म्हणाल्या, ‘मुलांना त्यांचा योग्यरीत्या सांभाळ करून सुरक्षित भविष्य देणाऱ्या पालकांची आवश्यकता असते. तशी मुलांची भावनिक गरज अनेक पालकांना असते, त्यामुळे मूल दत्तक देणे ही आनंददायी घटना असली तरी मुलाच्या भविष्याचा विचार करून चौफेर चौकशी करावीच लागते. दांपत्यापेक्षा एकट्या पालकाविषयी अधिक सतर्कता आम्ही बाळगतो. गेल्या काही वर्षांपूर्वी एकट्या महिलांकडूनच मुले दत्तक घेतली जात आणि संस्थाही देत. मात्र, काही वर्षांपासून हे चित्र बदलले असून एकटे पुरुषही मुलं दत्तक घेण्याची मागणी करत आहेत. अशा पुरुषांची पार्श्वभूमी, आर्थिक सुबत्ता, मूल सांभाळण्याची क्षमता आदी गोष्टी ध्यानात घेतल्या जातात. मगच मूल दत्तक दिले जाते; पण पुरुषांचा पुढाकार ही सकारात्मकच बाब आहे.’ (प्रतिनिधी)