ललित पाटील प्रकरणाचे धागेदोरे सरकारमधील मंत्र्यांपर्यंत- रविंद्र धंगेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 10:33 AM2023-12-19T10:33:32+5:302023-12-19T10:34:29+5:30
ललित पाटील याला संरक्षण देणाऱ्या ‘त्या’ मंत्र्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हिवाळी अधिवेशन प्रसंगी केली...
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाचा सखोल तपास तातडीने झाला पाहिजे. या प्रकरणाचे धागेदोरे सरकारमधील मंत्र्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे ललित पाटील याला संरक्षण देणाऱ्या ‘त्या’ मंत्र्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हिवाळी अधिवेशन प्रसंगी केली.
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाचा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर, मंत्र्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडत आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही त्यांनी ही भूमिका मांडून सरकारचे लक्ष वेधले होते. काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने विधानभवनात झालेल्या निदर्शनावेळी त्यांनी ‘या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करा’, चौकशीत दोषी ठरलेले 'ससून'चे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना सरकार का पाठीशी घालत आहे? त्यांना त्वरित अटक करावे, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.
यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अंबादास दानवे यांच्यासह अनेक नेते यात सहभागी झाले होते. काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने विधानभवनात झालेल्या निदर्शनात आमदार धंगेकर हे आज पुन्हा एकदा डॉक्टरच्या वेशभूषेत दिसून आले. स्टेथोस्कोप आणि ॲप्रन घालून डॉक्टरच्या वेशभूषेत ते निदर्शनात सहभागी झाले.