अँटिजेन टेस्टिंग घोटाळ्याचे धागेदोरे मुख्यालयापर्यंत? कर्मचाऱ्यांच्या जबाबातून धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 08:55 AM2022-12-09T08:55:26+5:302022-12-09T08:55:41+5:30
अतिरिक्त आयुक्तांना अंधारात ठेवणे आले अंगलट...
पुणे : पुण्यातील बहुचर्चित वारजे येथील कै. अरविंद बारटक्के दवाखान्यातील अँटिजेन टेस्टिंग घोटाळ्याचे धागेदोरे महापालिका आरोग्य विभागाच्या मुख्य इमारतीपर्यंत पोचत आहे. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी संबंधित सर्व कर्मचारी आणि डॉक्टरांचे जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. धक्कादायक म्हणजे यात कर्मचारी व डॉक्टरांनी बोगस नावांची नोंद केल्याची कबुली दिली आहे. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नावे घेतल्याचे देखील समजते. त्यामुळे या प्रकरणाला नवीनच ट्वीस्ट आला आहे.
कोरोना काळात वारजे येथील महापालिकेच्या दवाखान्यात कोरोना तपासणीचा अँटिजेन टेस्टिंग घोटाळा झाला आहे. अठरा हजार ५०० पैकी तब्बल ६० टक्क्यांहून अधिक रुग्णांच्या नोंदी या खोटी नावे वापरून केल्याची तक्रार डॉ. सतीश कोळसुरे यांनी केली. त्यावरून वारजे पोलिसांनी तपास करत त्याचा अहवाल दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेला दिला हाेता. तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हा प्रकार दाबण्यात येत होता. हे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले. यानंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली.
दोन जणांची समिती करतेय तपास :
आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी आणि मायक्रो बायोलॉजिस्ट ही दोन जणांची समिती गेल्या तीन दिवसांपासून अँटिजेन घोटाळ्याची चौकशी करत आहे. कसबा क्षेत्रीय कार्यालयात ही चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीला मंगळवारी सुरुवात झाली. त्यादिवशी बारटक्के रुग्णालयातील सर्व रेकॉर्ड मागवण्यात आले. त्यादिवशी आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली होती. बारटक्के दवाखान्यात काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय आरोग्य अधिकारी आशा तब्बल ४० जणांना बोलावण्यात आले आणि त्यांची तोंडी चौकशी केली.
कर्मचाऱ्यांची कबुली
लेखी जबाब घेण्यास बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. यामध्ये कर्मचाऱ्यांनी टेस्टिंग सेंटरवरील वरिष्ठांच्या सांगण्यावरून खोट्या रुग्णांच्या नोंदी केल्याचे चौकशी समितीपुढे कबूल केले. काही कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांनी आरोग्य विभागातील वरिष्ठांच्या सांगण्यावरून या नोंदी केल्या असल्याचे सांगितल्याचे कळते.
अतिरिक्त आयुक्तांना अंधारात ठेवणे आले अंगलट
वारजे टेस्टिंग घोटाळ्याची तसेच पोलिसांकडून अहवाल आल्याची पुसटशी कल्पनादेखील आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांना त्यांच्याच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली नव्हती. ‘लोकमत’ने हे प्रकरण उघडकीस आणल्यावर त्यांना याबाबत माहिती झाली. यानंतर आरोग्य विभागातील टॉपच्या अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावर घेत या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याचे आणि अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले. यामध्ये कोणाचेही नाव समोर आले तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने संबंधित सर्वांचे धाबे दणाणले आहेत.
आता अहवालाकडे लक्ष :
आठवडाभरात हा अहवाल देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या अहवालाकडे आता सर्व आरोग्य खात्याचे लक्ष लागलेले आहे. यामध्ये कोणाची नावे येतात आणि कोणावर हे प्रकरण शेकते हे लवकरच कळणार आहे.