प्रवेश रद्द करण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:53 AM2017-08-04T02:53:58+5:302017-08-04T02:53:58+5:30
राज्यातील काही विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तातडीने संपूर्ण शुल्क दोन दिवसांत भरा अन्यथा प्रवेश रद्द करू अशी सक्ती केल्याने अनेक विद्यार्थी व पालक अडचणीत आले होते.
पुणे : राज्यातील काही विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तातडीने संपूर्ण शुल्क दोन दिवसांत भरा अन्यथा प्रवेश रद्द करू अशी सक्ती केल्याने अनेक विद्यार्थी व पालक अडचणीत आले होते. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास ही बाब देण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांना अशी सक्ती करता येणार नसल्याचे आदेश काढण्यात येतील, असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आरक्षण हक्क संरक्षण समिती व दलित आदिवासी अधिकार आंदोलनाच्या शिष्टमंडळाने गिरीश महाजन व समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
याबाबत तातडीने कार्यवाही करून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत व त्यांची अडवणूक करणाºया महाविद्यालयांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळीउपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, प्रियदर्शी तेलंग, विद्यार्थी बिपीन शेलार व पालक सीमा शेलार, अविनाश खाडे, डॉ. संजय दाभाडे, मुक्ती साधना, प्रतिमा पडघम इत्यादी उपस्थित होते.
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी १ आॅगस्ट रोजी जाहीर झाली असून ५ आॅगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत तर ते विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतूनच बाहेर फेकले जातील, असे शिष्टमंडळाने समाजकल्याण आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.