माथाडी संघटनेकडून कंपनी मालकाला धमकी; पावणेदोन लाखांची खंडणी वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:08 AM2021-04-19T04:08:49+5:302021-04-19T04:08:49+5:30
सदर खंडणीचा प्रकार जानेवारी २०१९ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत चाकण औद्योगिक वसाहतीमधील इंडोस्पेस इंडस्ट्रीयल पार्क येथील मुबिया आटोमॅटिम ...
सदर खंडणीचा प्रकार जानेवारी २०१९ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत चाकण औद्योगिक वसाहतीमधील इंडोस्पेस इंडस्ट्रीयल पार्क येथील मुबिया आटोमॅटिम कम्पोनन्ट्स इंडिया प्रा. लि.( भांबोली, ता. खेड, जि. पुणे) येथे घडली आहे. याप्रकरणी लक्ष्मण पांडुरंग कारभारी (रा. कोंढवा खुर्द, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, अजय कौदरे, दत्ताभाऊ दौडकर, काळूराम शंकर कौदरे, कैलास कौदरे, एकनाथ रोडे, सौरभ पांडे, अतुल बुरसे, भरत दत्तू देवाडे यांच्यासह पिंपरी चिंचवड माथाडी कामगार बोर्डाच्या अधिकारी व कामगार यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय कौदरे हा इंडोस्पेस इंडस्ट्रीयल पार्क येथील मुबिया आटोमॅटीम कम्पोनन्ट्स इंडिया प्रा. लि.या कंपनीत येऊन,फिर्यादी यांना सांगितले की,कंपनीतील कामगार रवींद्र पांडे,समशेर सिंग यांना माझ्या माथाडी संघटनेचे दोन कामगार म्हणून नेमणूक करा,ते दोघे जण तुमच्या कंपनीत प्रत्यक्षात काम करणार नाहीत. तुम्ही या दोन कामगारांचा दरमहा वीस हजार रुपये पगार चेकद्वारे पिंपरी चिंचवड माथाडी व संरक्षित कामगार मंडळात भरायचा.जर तुम्ही याप्रमाणे केल्यास माझ्या माथाडी संघटनेकडून कसलाही त्रास होणार नाही,अन्यथा तुम्हाला कंपनी चालवणे अवघड करू, तुमच्यापैकी एकाला जीव गमवावा लागेल.अशी धमकी दिली आहे.तसेच कंपनीत माथाडी संघटनेचे कामगार काम करत नसतानाही अजय कौदरे याने फिर्यादीकडून खंडणी स्वरूपात १ लाख ७३ हजार ७०० रुपये घेतले आहेत.याप्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
--------------------------------------------------------