ड्रेनेज टेंडर प्रकरणावरुन पालिकेत जिवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 12:46 PM2019-09-23T12:46:14+5:302019-09-23T14:08:19+5:30
नगरसेविकेच्या विरोधात गुन्हा दाखल...
पुणे : टेंडरमध्ये रिंग करीत असताना नेहमीपेक्षा दुसऱ्या ठेकेदारांने टेंडर भरल्याने संतप्त झालेल्या नगरसेविकेच्या पतीने महापालिकेमधील अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार शुक्रवारी घडला़. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी बेकायदा जमाव जमवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे़. या प्रकारामुळे ते व त्यांचा मुलगा दोन तास तेथेच बसून होते़. शेवटी पोलिसांच्या मदतीनंतर ते बाहेर आले़.
शिवाजीनगर पोलिसांनी तुषार पाटील, विक्रम खेंगट, राहुल व इतर १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. हा प्रकार पुणे महापालिकेतील दुसऱ्या मजल्यावरील अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्या कार्यालयाजवळ २० सप्टेंबरला दुपारी २ वाजता घडला़. याप्रकरणी बलबिरसिंग मंगतसिंग छाबडा (वय ६४, रा़. खेसे पार्क, लोहगाव रोड) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले, की छाबडा हे ४० वर्षांपासून ठेकेदार असून पुणे शहरातील रोड, ड्रेजेन इत्यादी कामाचे महापालिकेचे कॉन्ट्रॅक्ट घेत असतात़. महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे ३० लाख रुपयांचे टेंडर त्यांनी १८ सप्टेंबर रोजी भरले होते़. त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता विक्रम खेंगट याचा त्यांना फोन आला़. तू ड्रेनेज विभागामध्ये टेंडर का टाकले़, तू माझ्या ऑफिसवर ये़ त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही़ दुसºया दिवशी ते व त्यांचा मुलगा रुबलसिंग महापालिकेत गेले होते़. त्यावेळी विक्रम खेंगट याने त्यांच्या मुलाला तुमचे हात-पाय तोडतो, अशी धमकी दिली़. त्यानंतर सायंकाळी छाबडा यांना तुषार पाटील यांनी फोन करून टेंडर काढून घे, म्हणून धमकी दिली़.
............
आता काम करून दाखव, तुला जिवे मारू
छाबडा व त्यांचा मुलगा रुबलसिंग हे २० सप्टेंबरला दुपारी टेंडरच्या कामासाठी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्या कार्यालयाजवळ काम करीत होते़. दुपारी २ वाजता अचानक तुषार पाटील, विक्रम खेंगट, राहुल व इतर १५ ते २० साथीदार आले़. ते छाबडा व मुलाला शिवीगाळ करू लागले़. तेव्हा छाबडा यांनी शिव्या का देता, असे विचारल्यावर तू ड्रेनेजचे टेंडर का टाकले़ आता काम करून दाखव, तुला जिवे मारू, अशी धमकी देऊन मारायला धावत आले़. तेव्हा घाबरून ते एका रूममध्ये पळून गेले़, तेव्हा ते रूमबाहेरून त्यांना शिवीगाळ करून धमकावू लागले़. त्यांनी १०० क्रमांकावर पोलिसांना फोन करून मदत मागितली़. पोलीस आल्यानंतर ते तेथेच घाबरून दोन तास बसून होते़ शेवटी ते निघून गेल्याचे समजल्यावर त्या रूममधून बाहेर आले़.
........
दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सायंकाळी गुन्हा दाखल करून घेतला असला तरी त्यानंतर त्याचा अद्याप काहीही तपास झालेला नाही़.
............