मोदींच्या जीवाला धोका; तरुणाचा कक्षाला ‘काॅल’, उदगीरच्या अभियंत्यास घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 10:10 AM2024-09-27T10:10:04+5:302024-09-27T10:10:15+5:30
पोलिसांनी काही मिनिटांतच संबंधित अभियंता तरुणाला ताब्यात घेतले.
पिंपरी (जि. पुणे) :पुणे दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचा ‘काॅल’ आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडे गुरुवारी सकाळी आला. त्यानंतर पोलिसांनी काही मिनिटांतच संबंधित अभियंता तरुणाला ताब्यात घेतले.
सचिन विजयकुमार मठपती (२४, सध्या रा. हडपसर, मूळ रा. उदगीर) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर वाकड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तो मानसिक तणावात असल्याचे दिसून येत असून, त्यातूनच त्याने कॉल केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
हाॅलीवूड चित्रपट, ‘एआय’चा परिणाम
संबंधित अभियंता तरुण हाॅलीवूड चित्रपट तसेच ‘एआय’वर आधारित व्हिडिओ सोशल मीडियावर पाहतो. पंतप्रधान मोदी नुकतेच पाश्चिमात्य देशांच्या दौऱ्यावर होते.
त्यात त्यांनी सोशल मीडिया आणि ‘एआय’बाबत वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्या जिवाला धोका असल्याचे वाटले, त्यामुळे काॅल केला, असे प्राथमिक तपासादरम्यान संबंधित तरुणाने सांगितल्याचे समोर आले आहे.