Pune | १४ वर्षांच्या मुलाला पळवून नेऊन ठार करण्याची धमकी; चालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 01:03 PM2023-02-14T13:03:04+5:302023-02-14T13:05:01+5:30
३८ वर्षांच्या नागरिकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली...
पुणे : शेजारील इमारतीत कारवर चालक म्हणून असलेल्याने १४ वर्षांच्या मुलाला मी खूप मोठा गुंड आहे. आताच जेलमधून बाहेर आलो आहे. तुला पळवून नेऊन ठार मारेन, अशी धमकी देऊन घरातून गुपचूप पैसे आणून देण्यास लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत सॅलेसबरी पार्क येथे राहणाऱ्या एका ३८ वर्षांच्या नागरिकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वारगेट पोलिसांनी सागर श्रवण पवार (वय २८, रा. राजीव गांधीनगर, एसपी कॉलेज) याला अटक केली. हा प्रकार ऑक्टोबर २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडला.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारील सोसायटीत राहणाऱ्या एकाकडे सागर पवार हा चालक म्हणून कामाला होता. त्यातून त्याने फिर्यादी यांच्या १४ वर्षांच्या मुलासोबत ओळख करून घेतली. त्याला त्याने मी खूप मोठा गुंड आहे. आताच जेलमधून बाहेर आलेलो आहे. तू जर तुमच्या घरातील पैसे गुपचूप आणून नाही दिले तर तुला पळवून घेऊन जाऊन जीवे ठार मारून टाकेल, अशी सतत धमकी देत. त्याला घाबरून फिर्यादी यांच्या मुलाने त्याला घरातील ४५ हजार रुपये आणून दिले होते. त्यानंतर १० फेब्रुवारीला रात्री १० वाजता फिर्यादीचा मुलगा पार्किंगमध्ये खेळत होता. त्यावेळी पवार याने त्याला पुन्हा धमकी देऊन घरातून कुणालाही न सांगता २५ हजार रुपये घेऊन ये, नाहीतर तुला पळवून नेऊन जीवे मारून टाकेल, अशी धमकी दिली.
मुलगा घरातून पैसे घेऊन जात असल्याचा संशय या मुलाच्या आजीला आला. तिने ही बाब फिर्यादी यांना सांगितली. त्यांनी मुलाला विचारल्यावर त्याने हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर फिर्यादी यांनी पवार याला जाब विचारला तेव्हा त्यांच्यात वादावादी झाली. पवार याच्यावर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे. त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी सागर पवार याला अटक केली असून पोलिस उपनिरीक्षक जगताप तपास करीत आहेत.