Pune Crime: शेतकऱ्याला ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 04:06 PM2022-10-12T16:06:03+5:302022-10-12T16:10:01+5:30
मारहाण व शिवीगाळ करून रक्कम जबरदस्तीने हिसकावून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक....
लोणी काळभोर (पुणे): दुचाकीवर येऊन पिकअपला आडवी मारून माझ्या दुचाकीला कट का मारला असे म्हणून शेतकरी व त्यांच्या मित्रास मारहाण व शिवीगाळ करून रक्कम जबरदस्तीने हिसकावून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक करण्यात आली आहे.
गणेश नागनाथ सातव (वय २७, रा. वांगी नं. ४, ता. करमाळा, जि. सोलापूर) या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून दीपक बाबासो हंडाळ (वय २६, रा. म्हसोबा चौक, हंडाळवाडी, केडगांव, ता. दौड) याला अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ ऑक्टोबर रोजी रात्री सातव हे मित्र वसंत भिकाजी राखुंडे यांच्या शेतातील झेंडूची फुले पिकअपमधून घेऊन गुलटेकडी मार्केटयार्ड, हडपसर, पुणे येथे गेले होते. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी झेंडूची विक्री करून गाडीभाडे ८ हजार रुपये घेऊन गावी जाण्यासाठी निघाले.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील हनुमान मंदिराच्या समोर आले असता डाव्या बाजूकडून एका नंबर नसलेल्या दुचाकीवरून हंडाळ आला व ‘तू माझ्या दुचाकीला कट मारला आहेस. तू तुझी गाडी बाजूला घे’, असे सांगितले. सातव यांनी गाडी सर्व्हिस रोडचे बाजूला घेतली असता हंडाळ याने सातव यांचे मित्र राखुंडे यास हाताने मारहाण करून गाडीतून खाली ओढले. मोबाईल काढून घेऊन हाताने मारहाण व शिवीगाळ केली. खिशात हात घालून ८ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून काढून घेतले व मोबाईल अंगावर फेकून लागलीच तो त्याच्याकडील दुचाकीवरून निघून गेला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कसलाही पुरावा नसताना पोलिसांपुढे गुन्हेगारांस पकडण्याचे मोठे आव्हान होते.
पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्याचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर हंडाळ यास पोलीस हवालदार राजेश दराडे व दीपक सोनवणे यांनी ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. महामार्गावर कवडीपाट टोलनाका ते यवत यादरम्यान वाटमारीचे अनेक गुन्हे घडले आहेत. हंडाळ याच्या अटकेमुळे ते उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.