बारामती| भावाला जीवे मारण्याची धमकी देत मुलीला पळवून नेऊन केले लग्न; मुलासह तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 07:09 PM2022-02-01T19:09:18+5:302022-02-01T19:14:22+5:30
आळंदी येथे नेऊन तिच्या मर्जीविरुद्ध तिच्या सोबत आरोपीने विवाह केला....
बारामती: मुलीच्या भावाला जीवे मारण्याच्या धमकी देत स्वत: आत्महत्या करण्याची धमकी देत पळवून नेऊन तिच्या बरोबर विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघड झाला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी संबंधित मुलासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे, एकजण फरारी आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला तिच्या मर्जीविरुद्ध पळून नेऊन लग्न केल्याबाबत कलम ३६६, ३५४- ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी पुण्याला एसटी मधून जात असताना ती पुण्यामध्ये पोहोचली नाही. त्याबाबत पोलिसांत ३० जानेवारी रोजी मीसिंगची तक्रार दाखल होती. त्यानुसार पोलीसांनी तपास करून मुलीला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर सबंधित मुलीने तक्रार दिली.
सहा महिन्यापासून ऋषिकेश अविनाश जगताप (रा. कोळी मळा, बारामती) याच्यासोबत ओळख होती. ओळखीनंतर ऋषिकेश तिचा सतत पाठलाग करत असे, ती त्याला विरोध करत होती .परंतु तो तिला लग्नाची मागणी घालत होता. मात्र, तिची त्याच्यासोबत लग्न करण्याची मानसिकता नव्हती. दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी तिला पुण्याला जाण्यासाठी बारामती बसस्थानकावर सोडविल्याचे ऋषिकेशला समजले. त्याने ती युवती बसलेल्या एसटी बसचा पाठलाग केला. शहरातील कसबा या ठिकाणी बस थांबवत तिला खाली उतरण्यास सांगितले. परंतु त्या मुलीने त्याचे ऐकले नाही. त्यानंतर मुलाने त्या मुलीस मोबाईलवर ती जर एसटीमधून उतरुन त्याच्यासोबत आली नाही, तर तिच्या भावाला मारून टाकू आणि स्वत:ही आत्महत्या करेल, अशी धमकी दिली. त्यामुळे सदर मुलगी भयभीत होऊन शिवरी येथे एसटीतून खाली उतरली.
यावेळी आळंदी येथे नेऊन तिच्या मर्जीविरुद्ध तिच्या सोबत आरोपीने विवाह केला. विवाहाला शुभम कराळे व किरण खोमणे (रा. बारामती) हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. त्यानंतर मुलगी पोलीस ठाण्यात आल्यानंतर तिने सर्व आरोपींविरुध्द तिचा विनयभंग केला. तिच्या मर्जीविरुद्ध विवाह आळंदी या ठिकाणी केल्याची फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी ऋषिकेश व शुभम या दोघांना अटक केली,तर किरण खोमणे फरारी असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके करीत आहेत.