मला जीवे मारण्याची धमकी, पण...; उमेदवारी अर्ज दाखल होताच बिचुकले 'टार्गेट'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 01:24 PM2023-02-08T13:24:03+5:302023-02-08T13:41:35+5:30
मी महाराष्ट्रातल्या मोठ-मोठ्या नेत्यांच्याविरोधात निवडणूक लढवली.
ओबीसी आरक्षण आणि इतर कारणास्तव महापालिका निवडणुकांसाठी सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेतच सर्व राजकीय पक्ष आहेत. मात्र, पुण्यातील दोन आमदारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मतदारसंघात पोटनिवडणुकांचे बिगुल वाजले आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत. आता, या दोन्ही उमेदवारांना आव्हान देण्यासाठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले कसब्याच्या मैदानात उतरले आहेत. मात्र, निवडणुकीच्या रिंगणात उतरताच अभिजीत बिचुकले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे त्यांनी तक्रारही केली आहे.
मी महाराष्ट्रातल्या मोठ-मोठ्या नेत्यांच्याविरोधात निवडणूक लढवली. पण, मला आजतागायंत कुणीही त्रास दिला नाही, ठाकरे कुटुंबीयांकडून कला कसालीह त्रास झाला नाही. मात्र, आज पुण्यातील कसब्यात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मला धमक्या दिल्या जात आहेत. मला जीवे मारण्याची धमकी दिली जातेय. कोण भुलक्कड नालायक, चवली-पावलीवर विकले जाणारे कार्यकर्ते मला धमकी देत आहेत.
आता, तुम्ही काय मी मेल्यावर येणार का? असा माझा पोलिसांना प्रश्न आहे, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मला मारणारा जन्माला आला नाही, असे म्हणत धमकी देणाऱ्यांना अभिजीत बिचुकलेंनी स्पष्ट शब्दात सांगितलंय. तसेच, मला वाटतं कुठल्या तरी मोठ्या राजकीय नेत्यानंच या कार्यकर्त्यांना सांगितंलय. मला वाटतं माझी सुपारी दिलेलीय, पण माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी बघू... असे म्हणत बिचुकले यांनी आपण कुठल्याही धमकीला घाबरत नसल्याचे सांगितले. तर, यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मी मला आलेल्या धमकीच्या फोनसंदर्भात माहिती दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरणारच
अभिजित बिचुकले यांच्या पत्नी अलंकृता यांनी काही दिवसांपूर्वीच कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विकत घेतला होता. त्यानंतर अभिजित बिचुकले यांनी मंगळवारी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन रितसर उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. जोपर्यंत मी विधानभवनात किंवा संसदेत जात नाही, तोपर्यंत निवडणूक लढणं हे मला भाग आहे. मी दोन वर्षांपासून कसबा पेठेत राहतोय. मग येथील लोकांचे प्रश्न माझे नाहीत का? मध्यंतरी 'कसबा भकास झाला' असे काही बॅनर्स लागले होते. त्याच भकास झालेल्या कसब्याला सजवायला मी येत आहे, असा विश्वास बिचुकले यांनी यावेळी व्यक्त केला.