मुलाला मारण्याची धमकी देऊन महिलेचे दागिने लुबाडले
By Admin | Published: May 15, 2016 12:53 AM2016-05-15T00:53:16+5:302016-05-15T00:53:16+5:30
चार वर्षांच्या मुलाला घेऊन वडिलांच्या घरी जात असलेल्या महिलेचा पाठलाग करीत पार्किंगमध्ये तिच्या मुलाला ताब्यात घेऊन मारण्याची धमकी देऊन अंगावरील दीड लाखांचे सोने चोरट्याने लंपास केले
पुणे : चार वर्षांच्या मुलाला घेऊन वडिलांच्या घरी जात असलेल्या महिलेचा पाठलाग करीत पार्किंगमध्ये तिच्या मुलाला ताब्यात घेऊन मारण्याची धमकी देऊन अंगावरील दीड लाखांचे सोने चोरट्याने लंपास केले. ही घटना शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास मार्केट यार्ड येथील वर्धमानपुरा येथे घडली. पोलिसांना आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्यावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
संगीता वस्तुपाल पालेशा (वय ३७, रा. गणेश पॅलेस सोसायटी, गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे. संगीता या पती वस्तुपाल, खेमचंद आणि दोन मुलांसह राहण्यास आहेत. त्यांच्या पतीचे रविवार पेठेमध्ये भांडी खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. तर, वडील ओंकारमल गुंदेचा हे मार्केट यार्डमधील गंगाधामजवळील वर्धमानपुरा सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास संगीता त्यांचा मुलगा जैनिल (वय ४) याला घेऊन वडिलांच्या घरी जात होत्या. त्या वेळी साधारणपणे ४० वर्षीय व्यक्तीने त्यांच्या नकळत पाठलाग करायला सुरुवात केली. संगीता वर्धमानपुरा सोसायटीच्या मुख्य गेटमधून पार्किंगमध्ये आल्या.
वडिलांच्या मालकीच्या सी १०३ या पार्किंगमध्ये गाडी पार्क करीत असताना पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्याशेजारी दुचाकी लावली. झटकन खाली उतरून संगीता यांच्या मुलाला उचलून ताब्यात घेतले. ‘तुम्हारे पास क्या क्या है, सब निकाल के दो’ असे त्याने विचारताच संगीता यांनी घाबरून हातातील पाटल्या काढून दिल्या. त्यानंतरही त्याने ‘और क्या क्या है तुम्हारे पास’ असे विचारल्यावर त्यांनी काही नाही, असे सांगितले. त्याने जवळ येत संगीता यांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावली. त्यानंतर जैनिलला सोडून देत स्वत:ची दुचाकी घेऊन तो पसार झाला.
पोलिसांनी त्याचे वर्णन घेतले असून, आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. हा चोरटा संगीता यांचा पाठलाग करीत असताना फुटेजमध्ये दिसत असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.