महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेत पंच मारुती सातव यांना धमकीचे फोन; चुकीचा निर्णय दिल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 04:51 PM2023-01-16T16:51:02+5:302023-01-16T19:14:03+5:30
स्पर्धा नियोजन समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी याबाबतीत पोलिसात तक्रार दिली असून पंचांना संरक्षण देण्याची मागणी केली
पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून कोथरुड पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच कोथरुड येथे शनिवारी पार पडली. या स्पर्धेतील अंतिम फेरीमधील सिंकदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड या कुस्तीमध्ये मारुती सातव यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिले.या कुस्तीतील एका डावामध्ये महेंद्र गायकवाड याला ४ गुण दिले. त्यावर मोठा वाद झाला. त्यानंतर रविवारी दुपारी मारुती सातव यांना संग्राम कांबळे या नावाने एकाचा फोन आला. त्याने मारुती सातव यांना धमकी दिली. तसेच हे संभाषण सोशल मीडियावर प्रसारित करुन स्वत:च्या रिव्हाल्व्हरमध्ये गोळ्या भरत असल्याचा व्हिडिओ प्रसारीत केला. याची मारुती सातव यांनी स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष पै. संदीप उत्तमराव भोंडवे यांच्याकडे तक्रार केली. कुस्तीस ज्युरी असलेले दिनेश गुंड यांनीही ते संभाषण सोशल मीडियावर ऐकले व त्यांनीही भोंडवे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार स्पर्धा नियाेजन समितीचे अध्यक्ष म्हणून भोंडवे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. तसेच पंच मारुती सातव व ज्युरी दिनेश गुंड यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात सातव यांचा जबाब नोंदवून घेण्यात येणार असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.