लाचेची तक्रार देणाऱ्या वकिलास रिव्हॉल्व्हर दाखवून जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 10:09 AM2019-01-24T10:09:11+5:302019-01-24T10:10:01+5:30
सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल
पुणे : पर्वती येथील जागेबाबत त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी १ कोटी ७० लाख रुपयांच्या लाचेची तक्रार देणाऱ्या वकिलाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी सराईत गुन्हेगार ऋषीकेश बारटक्के व शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला असून जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटक पूर्व जामीन फेटाळला आहे. तसेच यात मध्यस्थी करणारा अॅड. उमेश शेंडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ कोटी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीस अटक केली होती.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, अॅड. उमेश चंद्रशेखर मोरे (रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाचेची तक्रार दिली होती. त्यानुसार अॅड. शेंडे याच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आरोपी ऋषीकेश बारटक्के यांनी मोरे यांच्याशी संपर्क साधून तक्रारीबाबत चौकशी केली. ही जागा सध्या आमच्या ताब्यात आहे. या जागेचा निकाल त्यांच्याविरुद्ध गेल्याने ऋषीकेश बारटक्के व शहा यांना राग आला होता. २७ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी साडेबारा वाजता ते सेंट्रल बिल्डिंग येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागात आले होते. तेथून परत जात असताना मोरे यांना बारटक्के याने रस्त्यात अडवून तक्रार का दिली असे विचारुन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना हाताने मारहाण केली. या प्रकारे मोरे हे घाबरुन गेले होते.
त्यांनी भितीपोटी २ जानेवारी रोजी बंडगार्डन पोलिसांकडे अर्धवट तक्रार केली होती. या अर्जाची तपासणी केल्यानंतर बुधवारी बारटक्के व शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे हे अधिक तपास करीत आहेत.