दहीहंडी वर्गणीसाठी व्यापाऱ्याला जिवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 02:58 AM2018-08-27T02:58:56+5:302018-08-27T02:59:31+5:30
खंडणीचा या वर्षीचा पहिला गुन्हा : हडपसर पोलिसांनी केली एकाला अटक
पुणे : दहीहंडी उत्सवाकरिता मागेल तेवढी वर्गणी दिली नाही म्हणून हडपसरमधील एका व्यापाºयास तुझा काटा काढू असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत वर्गणी मागणाºयाविरुद्ध हडपसर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका व्यापाºयाने दिलेल्या फिर्यादीवरून विशाल आप्पा मिरेकर (रा. सर्व्हे नं. ५, गाडीतळ, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या इतर दोन साथीदारांचा हडपसर पोलीस शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या समाजकंटकाविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ३८६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही मंडळांचे कार्यकर्ते व्यापाºयांकडून दहीहंडी उत्सवासाठी जबरदस्तीने वर्गणी गोळा करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक वैजिनाथ पुणे, हवालदार युसूफ पठाण, राजेश नवले, राजू वेगरे आणि सैदोबा भोजराव हे हडपसर येथे पेट्रोलिंग करण्यासाठी गेले. त्यांनी काही व्यापाºयांशी त्यांच्या समस्यांबाबत विचारपूस केली. त्या वेळी बंटर शाळेजवळील दुकानात येऊन आरोपी विशाल मिरेकर आणि इतर दोघे जण उत्सवासाठी २ हजार रुपयांची वर्गणी मागत असल्याची माहिती समोर आली. आरोपींनी व्यापाºयाकडे २ हजार रुपयांची वर्गणी मागितली होती. त्यावर व्यापाºयाने मला अनेक मंडळांना वर्गणी द्यावी लागते. त्यामुळे तुम्ही ३०० रुपये घ्या, अशी विनंती केली. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी त्यांना तुझा काटा काढू असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली व १ हजार रुपयांची वर्गणी घेतली. आरोपींनी गेल्या वर्षी देखील हाच प्रकार केला होता. त्यामुळे पोलिसांनी व्यापाºयास विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
...तर नागरिकांनी तक्रार द्यावी
४मिरेकरच्या विरोधात आतापर्यंत चार ते पाच निनावी अर्ज आले आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. उत्सवाच्या नावाखाली जबरदस्तीने वर्गणी मागत असल्यास त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी, असे आवाहन वानवडी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद पाटील आणि हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी केले आहे.