वीस गावांच्या नळपाणी योजना धोक्यात
By admin | Published: February 5, 2016 02:19 AM2016-02-05T02:19:28+5:302016-02-05T02:19:28+5:30
यावर्षी भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. धरणातून मागील अडीच महिन्यांपासून पाणी खाली सोडल्याने गतवर्षीच्या तुलनेत
भोर : यावर्षी भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. धरणातून मागील अडीच महिन्यांपासून पाणी खाली सोडल्याने गतवर्षीच्या तुलनेत दोन महिने आधीच धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेली आहे. यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सुमारे २० गावे व वाड्या-वस्त्यांच्या नळ पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. पाणी खाली सोडण्याची परिस्थिती अशीच राहिल्यास, पुढील १५ दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी परिस्थिती भाटघर धरण भागात निर्माण झाली आहे.
भोर तालुक्यात या वर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे भाटघर धरण ७० टक्केच भरले होते. शिवाय, भाटघर धरणातून मागील ३ महिन्यांपासून पाणी खाली सोडल्याने धरणातील पाणीसाठा आता २१ टक्क्यावर आला आहे. दर वर्षी धरणातील पाणीसाठा मार्च महिन्याच्या अखेरीस कमी होतो. मात्र, यावेळी धरणातील पाणी लवकर खाली सोडल्याने व धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन महिने अगोदरच धरण रिकामे झाले आहे.
यामुळे भाटघर धरणाचे पाणी मळेगावापर्यंत १५ किलोमीटर खाली आले असून, खांडवा पडत
चालला आहे.
धरणाच्या पात्रात असणाऱ्या खुलशी, गृहिणी, मळे, चांदवणे डेर, नानावळे, कुरुंजी कांबरे बु., कांबरे खुर्द रांजणवाडी, करंदी बु., करंदी खु., वाढाणे वाकांबे, गोरड म्हशीवली, आस्कवडी, तळे म्हशीवली, जोगवडी माझगाव या गावच्या विहिरीचे व नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींचे पाणी कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे खरेदी-विक्री संघाचे संचालक काळुराम मळेकर व कुरुंजीचे उपसरपंच ज्ञानेश्वर नलावडे यांनी सांगितले. (वार्ताहर)