मतदान प्रतिनिधीला धमकावले; मेडदच्या सरपंचासह तिघांवर गुन्हा
By admin | Published: October 16, 2014 06:09 AM2014-10-16T06:09:00+5:302014-10-16T06:09:00+5:30
मेडद (ता. बारामती) येथे निवडणुकीच्या वादातुन एकास धमकावल्याचा प्रकार प्रकार घडला. या प्रकरणी गावचे सरपंच अर्जुन यादव यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती : मेडद (ता. बारामती) येथे निवडणुकीच्या वादातुन एकास धमकावल्याचा प्रकार प्रकार घडला. या प्रकरणी गावचे सरपंच अर्जुन यादव यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, बहुजन समाज पक्षाचे मतदान प्रतिनिधी रणजित लक्ष्मण गाढवे (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सरपंच अर्जुन शंकर यादव, गणेश दत्तात्रय काशिद, संतोष शिवाजी यादव (सर्व रा. मेडद) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
मतदान सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मतदारांना माहिती देत होते. त्यावेळी गाढवे यांनी ‘मतदारांना त्यांच्या मनाने मतदान करू द्या’ असे सांगितले. त्यानंतर आरोपी सरपंच यादव यांच्यासह तिघांनी गाढवे यांना शिवीगाळ, दमदाटी केली. या प्रकरणाची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. प्रकार थांबविण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नीलप्रसाद चव्हाण मतदान केंद्रावर गेले. गाढवे यांनी या प्रकरणी धमकावल्याची फिर्याद दिली.
त्यानुसार यादव यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के करीत आहेत. (प्रतिनिधी)