निधीवरून आरोप-प्रत्यारोप
By admin | Published: July 7, 2017 02:45 AM2017-07-07T02:45:36+5:302017-07-07T02:45:36+5:30
बारामती मोटर वाहन संघाच्या निधीवरून वादंग सुरूच असून, परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. सभासदांच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : बारामती मोटर वाहन संघाच्या निधीवरून वादंग सुरूच असून, परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
सभासदांच्या निधीचा कोणताही गैरवापर झाला नाही. या उलट संस्थेचे खजिनदार प्रमोद सातव यांनी संकलित झालेला निधी सभासदांमध्ये वाटून घ्या, अशी मागणी केली होती. त्याला विरोध केल्याने न्यायालयात तक्रार केली आहे. माझ्या सह्यांचा गैरवापर करून विश्वासघात केल्याचा दावा बारामती नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सचिन सातव यांनी केला.
सचिन सातव यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष दीपक तावरे, सचिव सौरभ गांधी यांच्या विरोधात बारामती मोटर वाहन संघाचे खजिनदार प्रमोद सातव यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. सचिन सातव यांनी एकट्याच्या सहीने संस्थेचे २ कोटी ६३ लाख रुपये हडप केले होते. त्यावर तक्रार झाल्यानंतर १ कोटी ७३ लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम पुन्हा खात्यावर भरली, असा आरोप केला आहे. या आरोपाचे सचिन सातव यांनी खंडन केले.
संस्थेच्या ट्रक टर्मिनलसाठी जागा खरेदी करण्याचे ठरले तेव्हा संस्थेच्या खात्यातून ४० लाख रुपये माझ्या खात्यावर जमा केले. उर्वरित निधीचा हिशेब खजिनदार प्रमोद सातव यांच्याकडेच आहे. त्यांच्याकडेच संस्थेचे दप्तर आहे. अध्यक्षांनी दप्तराची मागणी केली होती. ती त्यांनी दिली नाही.
तक्रारदार प्रमोद सातव हे चुलतभाऊ आहेत. त्यामुळे विश्वासाने त्यांना कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून चेकवर सह्या करून दिल्या. त्याचा त्यांनी गैरवापर करून उर्वरित रक्कम काढल्याचा दावा त्यांनी केला. जागा घेण्याचे रद्द झाल्यावर ४० लाख रुपये पुन्हा खात्यात जमा केले. आज संस्थेच्या खात्यात १ कोटी ८९ लाख १६ हजार ३२२ रुपये जमा आहेत.
ही जमा रक्कम संस्थेच्या ७ सभासदांमध्ये वाटून घेऊ, असे खुद्द प्रमोद सातव यांनीच सांगितले होते. त्याला आम्ही विरोध केला. त्या दरम्यान, सचिव सौरभ गांधी यांनी तक्रार केली होती. परंतु, त्यांची समजूत काढून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले, असेही त्यांनी सांगितले. जागा खरेदीची इसार पावती कार्यालयीन कामकाजासाठी जमा केली आहे. त्याचबरोबर धर्मादाय आयुक्तांच्या अभय योजनेंतर्गत संस्थेचे लेखापरीक्षण, चेंज रिपोर्ट घेण्यात आला आहे. या विरोधात आम्हीदेखील त्यांनी केलेल्या दाव्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत.
या प्रकरणात अनेक ‘गमती जमती’ आहेत. परंतु, त्या झाकली मूठ असावी, अशी आमची भूमिका असल्याचे सातव यांनी सांगितले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक तावरे, वकील अॅड. गिरीश देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.
आता न्यायालयात सत्य उघड...
याबाबत तक्रारदार तथा संस्थेचे खजिनदार प्रमोद सातव यांनी सांगितले, की संस्थेचा पैसा वैयक्तिक कारणासाठी वापरता येत नाही हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे निधी वाटून घ्या, असा आरोप करणे बालीशपणाचे आहे. जागेची इसार पावती त्यांनी सादर केली नाही. आता न्यायालयातच सत्य उघड होईल.