गाडी धुतल्याचे पैसे मागितल्याने मर्डर करण्याची धमकी; वाॅशिंग सेंटर चालकाला मारहाण करून तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 10:57 AM2023-08-02T10:57:18+5:302023-08-02T11:00:07+5:30
ही घटना वाकड परिसरात घडली...
पिंपरी : गाडी धुतल्याचे पैसे मागितल्याने तिघांनी वॉशिंग सेंटर चालकाला मारहाण केली. तसेच वॉशिंग सेंटरची तोडफोड करून जीवानीशी मारून टाकण्याची धमकी दिली. वाकड येथे रविवारी (दि. ३० ) रात्री ही घटना घडली.
सुमित दत्तात्रय शिंदे (वय २९, रा. चिंचवड) यांनी या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सिद्धार्थ विठ्ठल जौंजाळ (वय ३५, रा. चिंचवड) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह राहुल विठ्ठल जौंजाळ ( वय ३८) व एका महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्हीआयपी वॉशिंग सेंटर येथे काम करत असताना आरोपी तेथे त्यांची दुचाकी धुण्यासाठी आले. गाडी धुवून झाल्यानंतर पैसे मागितले. तुझ्या मालकाला काॅल लाव, तुझ्या मालकाचा मी दाजी आहे, असे म्हणत आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादीने जागा मालक सचिन केदारी यांना बोलावून घेतले. ते आपले नातेवाईक आहेत, असे केदारी यांनी सांगितले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा राहुल व सिद्धार्थ वॉशिंग सेंटरवर आले व त्यांनी तेथे तोडफोड करत २० हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच फिर्यादी व त्यांच्या मित्राला धक्काबुक्की केली. यात फिर्यादीच्या मित्राची सहा तोळ्याची अडीच लाख रुपयांची सोनसाखळी जबरदस्तीने काढून घेत आरोपींनी त्यांना मारहाण केली. राहुल व सिद्धार्थ फिर्यादीला धमकी दिली. उद्या तुझा मर्डर करतो, पोलिसांत तक्रार दिली तर सर्वांना जीवनाशी मारून टाकेन, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार तपास करत आहेत.