गोळीबार प्रकरणातील फरारी तीन आरोपींना निगडीत अटक
By admin | Published: April 21, 2015 02:56 AM2015-04-21T02:56:31+5:302015-04-21T02:56:31+5:30
तळवडेत गोळीबार केल्यानंतर दोन तासांच्या अवधीतच या टोळक्याने म्हाळुंगे येथे तरुणावर प्राणघातक हल्ला केला. दहशत माजवून फरार झालेल्या
पिंपरी : तळवडेत गोळीबार केल्यानंतर दोन तासांच्या अवधीतच या टोळक्याने म्हाळुंगे येथे तरुणावर प्राणघातक हल्ला केला. दहशत माजवून फरार झालेल्या आरोपींना जेरबंद करण्यात निगडी पोलिसांना सोमवारी यश आले. देहूरोड आणि चाकण हद्दीत गुन्हे घडले. मात्र आरोपींना ताब्यात घेण्याची कामगिरी निगडी पोलिसांनी बजावली.
शनिवारी रात्री तळवडेतील हॉटेलमध्ये जेवणाची आॅर्डर उशिरा आल्याने झालेल्या वादातून हॉटेल व्यावसायिक अमोल तुकाराम भालेकर (वय ३०, रा. रुपीनगर, तळवडे) यांच्यावर चौघांनी गोळीबार केला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात दत्तात्रय वाळके, राहुल पवार, मंगेश रसाळ, प्रशांत दिघे (सर्व रा. म्हाळुंगे) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
याच टोळक्याने तळवडेतील गोळीबार घटनेपाठोपाठ चाकण हद्दीतील म्हाळुंगे येथेही तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे. विशाल नारायण भोसले असे हल्ल्यात जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना त्याच रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. या घटनेबाबत विशालच्या चुलती आशा निर्गुण भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दत्तात्रय वाळके, राहुल पवार, मंगेश रसाळ यांच्यासह संकेत शिवले, भाऊसाहेब शेळके (सर्व रा. म्हाळुंगे) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. जिल्ह्यात नाकाबंदी जारी करण्यात आली. यामध्ये दत्तात्रय वाळके याला रविवारी पहाटे चाकण पोलिसांनी अटक केली. मात्र, इतर आरोपी फरार होते. निगडी पोलिसांनी राहुल पवार, मंगेश रसाळ, प्रशांत दिघे यांना अटक केली. निगडी प्राधिकरणात हे आरोपी येणार असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली होती.(प्रतिनिधी)