पुणे शहरातील साडेतीन हजार गुंडांची झाडाझडती; पिस्तुल, काडतुसांसह शस्त्रसाठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 11:36 AM2022-06-13T11:36:01+5:302022-06-13T11:37:07+5:30
१४ तडीपार मिळून आले हद्दीत...
पुणे : शहरातील गुंडांची झाडाझडती घेण्यासाठी मध्यरात्री गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्यांमधील पथकांनी विशेष माेहीम राबविली. या कारवाईत पोलिसांनी शहरातील साडेतीन हजार सराईत गुंडाची झाडाझडती घेतली. त्यापैकी ६८५ गुन्हेगार मूळ पत्त्यावर राहत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन पिस्तुलांसह, काडतुसे, तलवारी, कोयते जप्त केले. चंदननगर भागातील एका हुक्का पार्लरवरही कारवाई करण्यात आली. १४ तडीपारांवर कारवाई करण्यात आली.
शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी पोलिसांकडून अचानक विशेष मोहीम राबविण्यात येते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके, प्रियंका नारनवरे, सागर पाटील, पौर्णिमा गायकवाड, रोहिदास पवार, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलीस ठाण्याची पथके या मोहिमेत सहभागी झाली होती. बेकायदा पिस्तुल बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे शाखेने तीन ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली. बेकायदा तलवार, कोयते बाळगल्याप्रकरणी २९ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २ तलवारी, २१ कोयते जप्त करण्यात आले.
वडकी गावातील शेखर अनिल मोडक (वय २७), पंकज अभिमन्यू रणवरे (वय ३५, रा. रामकृष्ण अपार्टमेंट, बाणेर रस्ता) यांना अटक करण्यात आली. दोघांकडून दोन पिस्तुल, चार काडतुसे जप्त करण्यात आली.
पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत गुन्हे शाखेच्या युनिट एकने कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ५६ जिवंत काडतुसे, ७९ खराब काडतुसे तसेच ९७० बुलेट लिड जप्त केले. या प्रकरणी दिनेशकुमार कल्लूसिंग सरोज (वय ३४, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) याला अटक करण्यात आली.