पिंपरी-चिंचवड पोलिस सज्ज; मतदानासाठी साडेतीन हजार पोलिसांचा फौजफाटा
By नारायण बडगुजर | Published: November 17, 2024 04:37 PM2024-11-17T16:37:49+5:302024-11-17T16:38:00+5:30
मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त
पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २०) मतदान होणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवडपोलिस सज्ज झाले आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा फौजफाटा राहणार आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत पिंपरी, चिंचवड, भोसरी हे तीन मतदारसंघ तर खेड, खडकवासला, मुळशी, मावळ या मतदारसंघाचा काही भाग येतो. सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मतदान केंद्रांच्या सुरक्षेबाबतचा आढावा पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी घेतला आहे. बुथवर तसेच बुथबाहेर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत.
वाहतूक पोलिस नियुक्त
मतदान केंद्राबाहेर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून उपाययोजना करण्यात येणार आहे. वाॅर्डन तसेच वाहतूक पोलिस नियुक्त करून केंद्राबाहेर वाहतूक नियमन करण्यात येणार आहे.
स्ट्रायकिंग फोर्स
पोलिस आयुक्तालय हद्दीतील मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील सुरक्षेचा तसेच मतदान प्रक्रिया शांतते व भयमुक्त वातावरणात होत आहे किंवा कसे याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी पाहणी करणार आहेत. त्यांच्या सोबत स्ट्रयकिंग फोर्स राहणार आहे.
गुन्हे शाखेची पथके
मतदान केंद्र परिसरात गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच गुन्हे शाखेकडून विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. साध्या वेशातील पोलिस देखील ‘वाॅच’ ठेवणार आहेत.
मतदान यंत्रांसाठी पथके
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान केंद्रामधून मतमोजणी केंद्रापर्यंत मतदान यंत्रे सुरक्षित पोहचणे आवश्यक आहे. त्यासाठी देखील पोलिसांची विशेष पथके सज्ज करण्यात आली आहेत.
असा असेल पोलिस बंदोबस्त
अधिकारी : २५०
अंमलदार : ३५००
होमगार्ड : १०००
केंद्रीय राखीव दल : सहा तुकड्या
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस दक्ष आहेत. मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त राहणार असून, आयुक्तालय हद्दीत देखील नियमित गस्त राहणार आहे. नागरिकांनी निर्भयपणे उत्साहात मतदानासाठी बाहेर पडावे.
- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड