राज्य सरकारकडून पुणे विभागासाठी साडेतीनशे कोटींची नुकसानभरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 02:29 PM2019-12-18T14:29:30+5:302019-12-18T14:36:52+5:30
महाआघाडी सरकार सत्तेत येऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला, तरी शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते.
सुषमा नेहरकर-शिंदे -
पुणे : सरकार स्थापन झाल्यानंतर देखील शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्याची टीका सुरू झाल्यानंतर महाआघाडी शासनाने तातडीने आकस्मिकता निधीतून पुणे विभागासाठी ३२८ कोटी १० लाख रुपयांचा मदत निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरित केला आहे.
राज्यात आठ-दहा दिवसांसाठी आलेल्या राष्ट्रपती राजवटीत पुणे विभागात सुमारे दीडशे कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. आता अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदतीचे वाटप होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी सांगितले.
सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेतपिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. हाताशी आलेले पीक पावसामुळे वाहून गेले. शेत पिकासोबतच जनावरे, शेततळी, शेतीचे बांध, घरांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
राज्यात सत्तास्थापनेचे नाटक सुरू असताना शेतकरी मात्र या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे होरपळून निघत होता. सत्ता स्थापनेसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सरकार स्थापन करत असल्याचा आव आणला जात होता; परंतु शेतकºयांना मात्र प्रत्यक्ष मदत मात्र मिळत नव्हती.
राज्यात काही दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट आल्यानंतर राज्यपालांनी पुणे विभागासाठी तातडीची मदत म्हणून सुमारे दीडशे कोटी रुपयांची मदत केली; परंतु त्यानंतर महाआघाडी सरकार सत्तेत येऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला, तरी शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते.
याबाबत महाआघाडी सरकारवर विरोधकांनी टीका केली. शेतकरीदेखील नवीन सरकारकडून मदत मिळेल याच्या प्रतीक्षेत होते. अखेर महाआघाडी सरकारने पुणे विभागासाठी मदतीचा दुसरा हप्ता दिला आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी मदतीचा हप्ता प्राप्त झाला असून, लवकरच शेतकºयांच्या बँक खात्यात मदत निधीचे वाटप करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले, अशी माहिती उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी दिली.
.......
वाटप केलेला निधी व नव्याने मंजूर निधी
जिल्हा वाटप झालेला निधी (राष्ट्रपती राजवट) महाआघाडी सरकारकडून आलेला निधी
पुणे ३९ कोटी ५५ लाख ८६ कोटी ४४ लाख
सातारा १७ कोटी ५७ लाख ३८ कोटी ४० लाख
सांगली ३४ कोटी ४८ लाख ७५ कोटी ३४ लाख
सोलापूर ५८ कोटी १५ लाख १२७ कोटी ७ लाख
कोल्हापूर ३८ लाख ८४ लाख
एकूण १५० कोटी १५ लाख ३२८ कोटी १० लाख