दुचाकीच्या सीटखाली आढळतो जेव्हा साडेतीन फुटी नाग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 08:35 PM2019-08-23T20:35:10+5:302019-08-23T20:36:43+5:30
खासगी कामानिमित्त पत्नीसोबत शिरूर सातारा रस्त्यावर रांजणगाववरून केडगावकडे चालले होते..
केडगाव : पारगाव तालुका दौंड येथे एका दुचाकीच्या सीटखाली साडेतीन फूट नाग आढळल्याने चालकाची त्रेधातिरपीट उडाली. ही घटना गुरुवारी (दि 22 ) रोजी दुपारच्या सुमारास पारगाव येथील मुख्य चौकामध्ये घडली.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, रांजणगाव सांडस येथील चंद्रकांत रणदिवे दुचाकी (एमएच.12. क्यु.6124 ) खासगी कामानिमित्त पत्नीसोबत शिरूर सातारा रस्त्यावर रांजणगाववरून केडगावकडे चालले होते. यामध्ये रणदिवे पारगाव चौकांमध्ये आले असता गाडी बंद पडल्यासारखे जाणवू लागले. म्हणून त्यांनी गाडी चौकातील फिटर अनिल ताकवणे यांच्याकडे दाखवली. त्यावेळी गाडीची शीट खोलले असता गाडीमध्ये नागराज पाहताच ताकवणे व रणदीवे बोबडीच वळली.काही वेळामध्ये माहिती मिळताच चौकामध्ये ग्रामस्थ जमा झाले. नाग साडे तीन फुटी होता . ग्रामस्थांनी लगबगीने येथील सर्पमित्र प्रवीण रणदिवे यांना पाचारण केले. अथक प्रयत्नानंतर रणदिवे यांनी नाग ताब्यामध्ये घेतला. दरम्यान दुचाकीचालक रणदीवे यांना दवाखान्यात दाखल केल्याची माहिती ग्रामस्थ शांताराम बोत्रे यांनी दिली.