सव्वातीन तासांत यकृत पुण्यात!
By admin | Published: December 27, 2016 03:04 AM2016-12-27T03:04:31+5:302016-12-27T03:04:31+5:30
नाशिक येथून यकृत (लिव्हर) घेऊन निघालेली सुसज्ज रुग्णवाहिका पुणे-नाशिक महामार्गाने अवघ्या सव्वातीन तासांत पुणे येथे ठिकठिकाणच्या पोलिसांनी ग्रीन कॅरिडॉर
आळेफाटा : नाशिक येथून यकृत (लिव्हर) घेऊन निघालेली सुसज्ज रुग्णवाहिका पुणे-नाशिक महामार्गाने अवघ्या सव्वातीन तासांत पुणे येथे ठिकठिकाणच्या पोलिसांनी ग्रीन कॅरिडॉर राबवत रस्ता मोकळा केल्याने पोहोचली. यामुळे एका रुग्णाचे प्राण वाचले.
पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल रुग्णाचे यकृत प्रत्यारोपण करण्यासाठी नाशिक येथील ऋषिकेश हॉस्पिटलमधील एका १९ वर्षीय अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे यकृत काढून नेण्याचे ठरले. यकृत ठराविक वेळेत पोहोचणे अपेक्षित असल्याने पुणे येथील विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या वतीने महामार्गावरील संबंधित पोलीस ठाण्यांना याबाबत कळविण्यात आले.
दरम्यान, आज सोमवारी सकाळी सर्व तयारी पूर्ण झाली. सुसज्ज रुग्णवाहिकेतून यकृत घेऊन तज्ज्ञ डॉक्टर पावणेआठच्या वेळेला नाशिक येथून रवाना झाले, तर पोलिसांच्या ग्रीन कॅरिडॉरमुळे ही रुग्णवाहिका सव्वातीन तासांतच पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये पोहोचली, अशी माहिती अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या आरती गोखले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मोकळा रस्ता
नाशिक येथून यकृत घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेला वाहतुकीत अडथळा होऊ नये, यासाठी आळेफाटा पोलिसांनीही जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आळेखिंडी ते नारायणगावपर्यंत ग्रीन कॅरिडॉर केला होता. रुग्णवाहिका सुखरूप जाताच तैनात पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.