पालिकेचे साडेतीन हजार कर्मचारी
By admin | Published: September 14, 2016 03:53 AM2016-09-14T03:53:49+5:302016-09-14T03:53:49+5:30
दहा दिवस विराजमान झालेल्या गणेशाला अकराव्या दिवशी निरोप देण्यासाठीच्या विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासाठी महापालिकेने तब्बल ३ हजार ५०० कर्मचारी नियुक्त केले आहेत.
पुणे : दहा दिवस विराजमान झालेल्या गणेशाला अकराव्या दिवशी निरोप देण्यासाठीच्या विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासाठी महापालिकेने तब्बल ३ हजार ५०० कर्मचारी नियुक्त केले आहेत. मिरवणूक सुरू झाल्यापासून ती पूर्ण होईपर्यंत म्हणजे सलग २४ तासांपेक्षा अधिक वेळ हे कर्मचारी कार्यरत असतील.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला त्यांच्या हद्दीत विसर्जन झालेल्या गणेशाच्या मूर्ती वाघोली येथे नेण्यासाठी खास वाहन व चालक देण्यात आलेले आहेत. अशी एकूण ३५ वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याशिवाय, शहरातील मुठा नदीवरचे १७ घाट तसेच काही खासगी ठिकाणी मिळून विसर्जनासाठी म्हणून एकूण १५० हौद देण्यात आले आहे. निर्माल्य टाकण्यासाठी १२० हौदांची वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी ही माहिती दिली. विसर्जन मिरवणुकीसाठीची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे, असे ते म्हणाले.
विसर्जन मिरवणुकीसाठी पालिका प्रशासनाने विद्युत, आरोग्य, अग्निशमन तसेच अन्य अनेक विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. असे एकूण साडेतीन हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
डेक्कन जिमखाना व नूतन मराठी विद्यालय, लक्ष्मी रस्ता या दोन ठिकाणी पालिकेच्या आरोग्य विभागाची दोन पथके डॉक्टर, नर्स तसेच वाहनांसहित सज्ज असतील. सर्व घाटांवर तसेच विसर्जन होत असलेल्या विहिरी, तलाव या ठिकाणी अग्निशामक दलाने त्यांचे जीवरक्षक दिले आहेत.
आतापर्यंत चारशेपेक्षा जास्त टन निर्माल्य जमा झाले असून, पालिकेकडून ते प्रक्रिया करण्यासाठी पुढे पाठविले जात आहे. अखेरच्या दिवशी निर्माल्याचे प्रमाण एकदम वाढेल. ते जमा करून घेण्यात अडचण येऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्थाही तयार ठेवण्यात येत आहे.
घाटांवर नियुक्त केलेल्या कर्मचारी, जीवरक्षक, वैद्यकीय पथकातील डॉक्टर व अन्य कर्मचारी यांना मिरवणूक संपेपर्यंत आपापल्या ठिकाणीच थांबण्यास सांगण्यात आले आहे. हौदात पुरेसे पाणी असेल, याची सतत पाहणी होत राहील. विसर्जित गणेशमूर्तींची संख्या जास्त झाल्यानंतर पर्याय म्हणून काही हौद राखीव ठेवण्यात आले आहेत.