मेट्रोचे साडेतीन हजार कामगार गेले गावाकडे, टाळेबंदीत काम सलग तीन महिने होते बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 05:35 PM2021-04-15T17:35:30+5:302021-04-15T17:36:21+5:30
होळीला गेलेलेही अजून परतले नाहीत
पुणे: कोरोनाच्या पुण्यातील वाढत्या प्रादुर्भावामुळे मेट्रोच्या कामावर असलेले साडेतीन हजार कामगार आपापल्या गावी निघून गेले. कामाच्या गतीवर त्याचा परिणाम झाला असून प्राधान्य मार्ग विहित मुदतीत सुरू करणेही प्रशासनाला अडचणीचे होऊ लागले आहे. मागील कोरोना टाळेबंदीत मेट्रोचे काम सलग तीन महिने बंद होते. त्याहीवेळी कामगार असेच गावी निघून गेले होते.
मेट्रोच्या कामावर असलेले बहुतांश कामगार ऊत्तरप्रदेश बिहार मध्यप्रदेश या राज्यांमधील आहेत. होळीचा सण तिथे जोरात असतो. त्यासाठी ते गेले होते. त्यानंतर पुण्यात कोरोना स्थितीत वाढ झाली. त्यामुळे त्यांच्यातील अनेकजण परत आलेलेच नाहीत.
पुण्यात खाटा नाहीत,ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर नाहीत अशी स्थिती होऊ लागल्यावर इथे राहिलेले अनेक कामगार अचानक ग्रुप करून आपापल्या गावी निघून गेले. किमान साडेतीन हजारांनी कामगारांमध्ये घट झाली असल्याची माहिती मिळाली. ठेकेदारांकडे असलेले यातील बहुसंख्य कामगार मेट्रोच्या कामात कुशल आहेत. त्यामुळे तर ठेकेदार कंपनीची जास्त अडचण झाली आहे.
वनाज ते गरवारे महाविद्यालय तसेच पिंपरी- चिंचवड ते बोपोडी हे दोन मार्ग प्राधान्य मार्ग म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. यातील पिंपरीकडचा मार्गाची चाचणी घेण्यात आली आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय मार्गाचे अंतीम काम सुरू आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या कामांची आता अडचण झाली आहे. पुरेशा संख्येने कामगार ऊपलब्ध होत नसल्याने कामाची गती कमी झाली आहे.
कामगारांची संख्या कमी झाली आहे. होळीसाठी म्हणून गेलेले बरेचसे कामगार परत आलेले नाहीत व आता कोरोनाच्या भीतीने मोठ्या संख्येने कामगार गावी जाऊ लागले आहेत. कामाची गती यातून कमी होत आहे.
अतूल गाडगीळ- संचालक, प्रकल्प
कामगारांची आरोग्याची तसेच कोरोनापासून सुरक्षेची सर्व प्रकारची काळजी मेट्रो प्रशासनाकडून घेतली जात आहे. आता लस दिली जात आहेच,शिवाय ग्रुप करून त्यांना स्वतंत्रपणे लस देण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
हेमंत सोनवणे- संचालक, जनसंपर्क