वाघोली पोलीस चौकीत तरुणाने पेटवून घेतल्याप्रकरणी सहायक फौजदारासह तिघांना निलंबित; २ दिवसात ६ पोलीस निलंबित
By विवेक भुसे | Published: February 15, 2024 09:50 AM2024-02-15T09:50:27+5:302024-02-15T09:50:50+5:30
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी हा आदेश काढला आहे...
पुणे : मारहाण करणार्यांना पोलिस अटक करीत नसल्याच्या कारणावरुन वाघोली पोलीस चौकीत तरुणाने पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची गंभीर दखल घेऊन या चौकीतील सहायक फौजदारासह तिघा पोलिसांना निलंबित केले आहे. सहायक फौजदार अशोक घेगडे, हवालदार कैलास उगले आणि हवालदार महेंद्र शिंदे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी हा आदेश काढला आहे. गेल्या दोन दिवसात सहायक पोलीस निरीक्षकांसह ६ जणांना निलंबित करण्याची वेळ शहर पोलीस दलावर आली आहे. पोलीस चौकीत महिलेशी गैरवर्तन करुन तिला मारहाण केल्याप्रकरणात मगरपट्टा सिटी पोलिस चौकीतील सहायक पोलिस निरीक्षकासह तिघांना मंगळवारी रात्री निलंबित करण्यात आले होते.
रोहिदास जाधव (वय ३४, रा. वाघोली) हा आपण दिलेल्या तक्रारीत आरोपींवर काय कारवाई केली हे विचारण्यासाठी वाघोली पोलीस चौकीत १३ फेब्रुवारी रोजी आला होता. त्यावेळी सहायक फौजदार घेगडे, हवालदार उगले व शिंदे यांनी त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. तसेच त्याला अपमानास्पद वागणुक दिली़ त्यामुळे त्याने पोलीस चौकीच्या आवारात पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात तो ९५ टक्के भाजला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून तक्रारदार यांचे तक्रारीबाबत वेळीच योग्य दखल न घेता त्यांना अपमानास्पद वागणुक देऊन त्यांचे कर्तव्यात निष्काळजीपणा केला आहे. त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने तिघांना निलंबित करण्यात आले आहे. या दोन्ही घटनांना जबाबदार धरुन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोणीकंद आणि हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची कालच बदली केली आहे.