पुण्यात ‘स्पेशल छब्बीस’चा डाव टाकणारा ताे पाेलीसच! नाशिक दलातील पोलिसासह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 11:50 AM2022-07-01T11:50:49+5:302022-07-01T12:36:24+5:30

पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने काढावा लागला होता पळ...

Three arrested along with Nashik police pune fake police raid in warje | पुण्यात ‘स्पेशल छब्बीस’चा डाव टाकणारा ताे पाेलीसच! नाशिक दलातील पोलिसासह तिघांना अटक

पुण्यात ‘स्पेशल छब्बीस’चा डाव टाकणारा ताे पाेलीसच! नाशिक दलातील पोलिसासह तिघांना अटक

Next

पुणे :लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस असल्याचे सांगून पुण्यातील नगररचना उपसंचालकांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना वारजे पोलिसांनी ठाणे आणि नाशिक येथून अटक केली आहे. विशेष म्हणजे त्यात नाशिक शहर पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. यातील मुख्य आराेपींनी नगररचना उपसंचालकांच्या घरी ‘स्पेशल छब्बीस’चा डाव टाकण्याची योजना आखली हाेती. त्यासाठी मित्र घाग आणि पत्नीलाही बरोबर घेतले हाेते. वारजे पोलीस घटनास्थळी दाखल झाले अन् त्याला पळ काढावा लागला होता.

अधिक माहितीनुसार, गणेश संतोष पाटील (वय ४१) हा नाशिक शहर पोलीस दलात कार्यरत आहे. त्याने यापूर्वी मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात ६ वर्षे काम केले होते. त्याची पत्नी जयश्री गणेश पाटील (३७, रा. इंद्रानगर, नाशिक) आणि हर्षल श्रीकांत घाग (३४, रा. शिवाईनगर, ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कर्वेनगर येथील नगररचना उपसंचालक यांच्या घरात शुक्रवारी सकाळी तिघेजण शिरले. आम्ही मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस आहोत, असे सांगत त्यांनी कारवाईचा बहाणा केला होता. त्याची माहिती मिळाल्यावर वारजे ठाण्याच्या पोलीस अधिकारी तृप्ती पाटील तेथे पाेहोचल्या. त्यांनी चौकशी केल्यावर गडबडून ताेतया अधिकारी तेथून पळून गेले होते.

असा लागला तपास

- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून ताेतया पाेलीस नगररचना उपसंचालकांच्या घरात घुसला हाेता. पोलीस उपनिरीक्षक तेथे आल्याने चोरट्यांचा डाव फसला होता. त्याचा तपास करीत असताना पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्या वेळी हे तिघेजण एका स्कोडा गाडीतून आल्याचे दिसले. संचालकांच्या घरी येण्यापूर्वी गाडी आंबेडकर चौकात फिरली होती. तेथे गाडीचा नंबर पोलिसांना मिळाला. ती गाडी हर्षल घाग याच्या नावावर असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी घाग याला ठाण्यातून ताब्यात घेतले.

अधिक चौकशीत पोलीस कर्मचारी गणेश आणि त्याची पत्नी जयश्री या दोघांची नावे समोर आली. वरिष्ठ पोलीस शंकर खटके, दत्ताराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, नरेंद्र मुंढे, कर्मचारी अमोल राऊत, रवी गाडे, हनुमंत मासाळ, महिला कर्मचारी कोंडे यांच्या पथकाने अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा लावून त्यांना अटक केली.

अशी सूचली कल्पना

पोलीस कर्मचारी गणेश पाटील याने माध्यमांतून पुण्यात नगररचना सहसंचालक हणमंत नाझीरकर याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची झालेली कारवाई पाहिली होती. तसेच फिर्यादीबाबत माहिती जमा केली होती. शांत, संयमी स्वभावामुळे ते अलगद आपल्या जाळ्यात अडकतील असे त्याला वाटले होते. तोतया पोलिसांच्या प्रकाराचीही त्याला माहिती होती. त्यातूनच त्यांनी हा डाव रचला हाेता.

Web Title: Three arrested along with Nashik police pune fake police raid in warje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.