पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला ४ लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 03:08 PM2021-11-23T15:08:04+5:302021-11-23T15:15:34+5:30
फिर्यादी यांचे पिसोळी येथे दोन ठिकाणी मिळकती आहेत़ त्याकडे जाणार्या रस्त्यावर दिपक निंबाळकर याने राडारोडा टाकला होता...
पुणे : प्लॉटवर जाण्यासाठी आलेल्या रस्त्यावर जाणीवपूर्वक राडा रोडा टाकून तो उचलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडे ४ लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे घेण्यासाठी आलेल्या तिघांना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. दीपक विजय निंबाळकर (वय २९, रा. निंबाळकरवस्ती, पिसोळी, ता. हवेली), गणेश जगताप (वय २८, रा. महम्मदवाडी, हडपसर) आणि अमर अबनावे (वय २९ रा. उरळी देवाची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी जुबेर बाबु शेख (वय ४१, रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. जुबेर शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर चिटणीस आहेत. त्यांचा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांचे पिसोळी येथे दोन ठिकाणी मिळकती आहेत़ त्याकडे जाणार्या रस्त्यावर दिपक निंबाळकर याने राडारोडा टाकला होता. तो राडारोडा उचलण्यासाठी फिर्यादी व त्यांचा मित्र सचिन ननावरे यांनी फोन करुन सांगितले. हा राडारोडा उचलण्यासाठी दीपक निंबाळकर व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्याकडे ४ लाख रुपयांची मागणी केली.
पैसे घेऊन कोंढवा कात्रज रोडवरील कान्हा हॉटेल येथे बोलावले. शेख यांनी याची तक्रार खंडणी विरोधी पथकाकडे केली. सोमवारी दुपारी शेख हे ४ लाख रुपये घेऊन कान्हा हॉटेल येथे गेले. शेख यांच्याकडून खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी तिघांना सापळा रचून पकडले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.