अल्पवयीन मुलाकडे दीड लाखांची खंडणी मागणार्या तिघांना अटक; बांबुने केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 10:00 PM2021-07-27T22:00:28+5:302021-07-27T22:02:03+5:30
याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलाने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पुणे : अल्पवयीन मुलाला बोलावून घेऊन त्याच्याकडे दीड लाखांची खंडणी मागणार्या तिघांना विश्रांतवाडीपोलिसांनीअटक केली आहे. पैसे देण्यास नकार दिल्याने चौघांनी या मुलाला लाकडी बांबुने मारहाण केली.
रोहन गुंजाळ (वय १९, रा. येरवडा), चेतन रणपिसे (वय २०, रा. येरवडा), आशुतोष भुजबळे (वय १९, रा. भैरवनगर, धानोरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना धानोरीतील भैरवनगरमध्ये २५ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली होती. अखिल पलांडे (वय २६, रा. मुंजोबा वस्ती, धानोरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलाने विश्रांतवाडीपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आरोपी हे फिर्यादीचे मित्र आहेत. आरोपीने फिर्यादी यांना बरोबर घेऊन भैरवनगर येथे आणले. अखिल पलांडे याने तुझ्याकडून दीड लाख रुपये घेण्यास सांगितले आहे, असे सांगून पैशांची मागणी केली. त्याने नकार दिल्यावर चेतन रणपिसे याने लाकडी बांबुने फिर्यादीला मारहाण केली. रोहन गुंजाळ याने पाईपाने मारहाण करुन खाली पाडले. आशुतोष भुजबळ याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीच्या आईला फोन करुन शिवीगाळ केली. सहायक पोलीस निरीक्षक एस़ एम़ निकम तपास करीत आहेत.