Pune: पोलिसांना मारहाण करणाऱ्या तिघांना अटक; सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल
By विवेक भुसे | Published: April 3, 2023 08:02 PM2023-04-03T20:02:16+5:302023-04-03T20:05:21+5:30
बीट मार्शलने चौकशी केल्यावर त्याला मारहाण करणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली...
पुणे : मध्यरात्री कार घेऊन संशयास्पदरित्या थांबलेल्या तिघांकडे गस्तीवरील बीट मार्शलने चौकशी केल्यावर त्याला मारहाण करणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. मितेश संजय परदेशी (वय ३२, रा. जगतापनगर, वानवडी), मनिष जयप्रकाश मेहता (वय ३६, रा. मेहदसे हॉस्पिटल, दापोली, जि. रत्नागिरी), सुमित राजेश परदेशी (वय ३६, रा. शांतीनगर, वानवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी पोलीस अंमलदार रोहित पाटील यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंहम्मदवाडी येथील रहेजा प्रिमियम सोसायटीसमोर रविवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे उंड्री बीट मार्शल म्हणून कार्यरत आहेत. ते मध्यरात्री गस्त घालत असताना त्यांना रहेजा सोसायटीसमोर एक संशयास्पद कार थांबलेली आढळली. त्यांनी कारजवळ जाऊन आतील लोकांकडे विचारपूस केली. तेव्हा मनिष मेहता याने फिर्यादी यांना तू कोण आहेस आम्हाला विचारणारा, तुला माहित आहे का आम्ही कोण आहोत? असे बोलून फिर्यादी यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली.
त्यांच्या शर्टाचे बटण तोडून फिर्यादी यांचे गालावर चापट मारुन इतरांनी आरेरावीची भाषा करुन शिवीगाळ करुन तुला इथेच संपवतो, अशी धमकी दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली आहे़ तिघांना न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.