IPL वर सट्टा घेणार्या तिघांना अटक; कोंढव्यात मोठी कारवाई, पब मालकासह बड्या बुकींचा समावेश
By विवेक भुसे | Published: May 21, 2023 12:29 PM2023-05-21T12:29:23+5:302023-05-21T12:29:33+5:30
चेन्नई सुपर किग्स व दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामन्यावर ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या वेबसाईट आयडीद्वारे मोबाईल व लॅपटॉपचा वापर करुन सट्टा घेतला जात होता
पुणे : आयपीएलमधील चिन्नई विरुद्ध दिल्ली कॅपिटल या सामन्यावर सट्टा घेणार्यावर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने छापा टाकून तिघांना अटक केली आहे. वसीम हनीफ शेख (वय३९, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द), इक्रामा मकसुद मुल्ला(वय २६, रा. मदने सोसायटी, घोरपडी पेठ) आणि मुसाबिन मेहमुद बाशाइब (वय ३५, रा. सोमवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जितेश मेहता (रा. पुणे) व अक्षय तिवारी (रा. इंदोर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस नाईक शंकर संपते यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई कोंढव्यातील साईबाबानगर येथील धर्मश्री सिग्नेचर सोसायटीत शनिवारी सायंकाळी करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथक कोंढव्यातील धर्मश्री सिग्नेचर सोसायटीत पोहचले. चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामन्यावर ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या वेबसाईट आयडीद्वारे मोबाईल व लॅपटॉपचा वापर करुन सट्टा घेतला जात होता. पोलिसांनी तेथे असलेल्या तिघांना पकडले. त्यांच्याकडून ५ मोबाईल, लॅपटॉप व एक डायरी असा १ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यातील माहितीनुसार, त्यांनी यापूर्वीही आयपीएल २०२३ मधील सामन्यांवर सट्टा घेतलेले व खेळलेले दिसून आले आहे. त्यांच्याबरोबर जितेश मेहता आणि इंदौर येथील अक्षय तिवारी यांच्याशी संगनमत करुन हा सर्व प्रकार सुरु होता. जितेश मेहता हा पबमालक आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव हे अधिक तपास करीत आहेत.