रेमडेसिविरच्या काळाबाजार प्रकरणी खोपोलीतून तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:10 AM2021-05-01T04:10:05+5:302021-05-01T04:10:05+5:30
-- नारायणगाव : रेमडेसिविर इंजेक्शन विक्री प्रकरणात नारायणगाव येथे अटक केलेल्या आरोपीच्या तपासात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ...
--
नारायणगाव : रेमडेसिविर इंजेक्शन विक्री प्रकरणात नारायणगाव येथे अटक केलेल्या आरोपीच्या तपासात
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी विकलेले रेमडेसिविर इंजेक्शन त्यांनी खोपोलीतील तीन व्यक्तींकडून आणल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत खोपोलीत तिघा जणांना अटक केली, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
स्वप्निल सुनील देशमुख (गुरव) (वय १९ रा. विठ्ठल मंदिरासमोर, वरची खोपोली), आकाश प्रकाश कलवार (वय २५ रा. लोहानाहाॅल समोर , कल्पतरू अपार्टमेंट , खोपोली), विनोद जगदीशप्रसाद जाकोटीया (वय ४० रा. विनोद बिल्डिंग , विनोद सिरॅमिक्स, शास्त्रीनगर, खोपोली, ता. खालापुर , जि. रायगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
रेमडेसिविर काळ्या बाजारात विकल्या प्रकरणी अटकेत असणारा आरोपी रोहन शेखर गणेशकर याचेकडे नारायणगाव पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने
रेमडेसिविर इंजेक्शन हे खोपोली (जि. रायगड) येथून स्वप्निल सुनील देशमुख (गुरव) (वय १९, रा. विठ्ठल मंदिरासमोर, वरची खोपोली), आकाश प्रकाश कलवार (वय २५ रा. लोहाना हाॅलसमोर, कल्पतरू अपार्टमेंट, खोपोली), विनोद जगदीशप्रसाद जाकोटीया (वय ४०, रा. विनोद बिल्डिंग, विनोद सिरॅमिक्स, शास्त्रीनगर, खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड) यांच्याकडून मिळाल्याची माहिती सांगितली. त्यामुळे त्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
नारायणगाव पोलिसांनी वारूळवाडी येथे रेमडेसिविर इंजेक्शन ४५ हजार रुपयांना विकत असताना रोहन शेखर गणेशकर यास अटक करण्यात आली होती. त्या वेळी त्याचेकडून ३ रेमडेसिविर इंजेक्शन ताब्यात घेतली होती. गणेशकर हा खोपोली येथील स्वप्नील देशमुख, आकाश कलवार, विनोद जाकोटीया यांच्याकडून घेतले व ते गरजू पेशंटच्या नातेवाइकांची गरज पाहून प्रत्येकी २५ ते ४५ हजार रुपयेप्रमाणे इंजेक्शन विकत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी तिन्ही संशयितांना २९ एप्रिल रोजी रात्री खोपोली येथून ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी रेमडेसिविर इंजेक्शन हे आम्हीच दिले असल्याचे कबूल केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे करीत आहेत.
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस नाईक धनंजय पालवे, कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे, कॉन्स्टेबल सचिन कोबल यांच्या पथकाने केली.
--
चौकट : विनोद जगदीशप्रसाद जाकोटीया हा उद्योगपती असून त्याचा भाऊ डॉक्टर आहे. भावाचे कोविड सेंटर आहे. स्वप्निल देशमुुख हा खोपोली नगरपालिकेत आरोग्य कर्मचारी आहे . आकाश कलवार हा खोपोली येथील एका प्रसिद्ध वॉटरपार्क मध्ये कामाला होता . पुढील तपासात रेमडेसिव्हरचा काळा बाजार करणाऱ्या टोळीत आणखीन काही साथीदार निष्पन्न होण्याची वर्तविली जात आहे