गतिमंद मुलाची काळजी न घेतल्याप्रकरणी शाळेच्या व्यवस्थापकासह तिघेजण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 09:31 PM2018-03-23T21:31:21+5:302018-03-23T21:31:21+5:30
पालकांनी सांगूनही शाळेने गतिमंद मुलाची काळजी न घेतल्याने अखेर विद्यार्थ्याच्या आईने पोलिसात धाव घेतली.त्यानुसार येरवडा पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे.
पुणे :
गतिमंद मुलाची काळजी न घेतल्याप्रकरणी येरवडा येथील सी.पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलचा अॅडमिन आणि दोन शिक्षिकांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. कुमार मधुकर म्हामुणकर (वय ३०, रा. येरवडा), जसींता कुमार विल्सन (वय ४२, रा. रक्षकनगर, खराडी) आणि शलीना शहनवाज अडतानी (वय ३२, रा. कल्याणीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर एकूण १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हामूणकर हा शाळेचा अॅडमिन असून विल्सन व अडतानी या शिक्षिका आहे. याप्रकरणी सात वर्षीय पीडित मुलाच्या आईने सोमवारी येरवडा पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गोयंका स्कूलचे व्यवस्थापक संदीप गोयंका, अर्चना गोयंका, मेघा दोंडेजा, माजी मुख्याध्यापक शेफाली तिवारी, रिमा खुराणा, निशा शहा, समुपदेशक लिनाझ सुनावला आणि पुजा व सचिन (पुर्ण नाव समजले नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित मुलाला शाळेच्या कर्मचा-यांनी शारिरीक शिक्षा देवून मानसिक व भावनिक छळ केला. तसेच हा विद्यार्थी गतीमंद असल्याची कल्पना शाळेला देण्यात आली होती. मात्र तरीही शाळेने त्याप्रकारे त्यांची काळजी घेतली नाही, अशी फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय दंड विधानच्या कलम ४१९, ४०६, ३११, ३१७, ३२३, १२०, राईट टू एज्युकेशन अॅक्ट, बाल न्याय कायद्यातील कलम २३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेच्या अशा वागणुकीमुळे मुलगा शाळेत जाणे टाळत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.