बँक मॅनेजरच्या मदतीने बँकेला गंडा घालणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:17+5:302021-07-16T04:10:17+5:30
मनोज कैलास गायकवाड (वय ४७, रा. धनकवडी), शेखर प्रल्हाद साळुंके (वय ४३) आणि सचिन प्रल्हाद साळुंके (वय ४३, दोघेही ...
मनोज कैलास गायकवाड (वय ४७, रा. धनकवडी), शेखर प्रल्हाद साळुंके (वय ४३) आणि सचिन प्रल्हाद साळुंके (वय ४३, दोघेही रा. सदाशिव पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर बँक मॅनेजर कुमार सिद्धेश्वर पारखी (रा. बुधवार पेठ) आणि प्रमोद अरुण मोघे (रा. पर्वती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणी रमेश निवृत्ती डिंबळे (वय ५२, रा. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान शारदा सहकारी बँकेच्या सिंहगड रस्ता शाखेत घडला. बँकेची फसवणूक करण्यासाठी आरोपींनी मोघे याच्या मिळकत कराचे बनावट कागदपत्रे वापरून गायकवाड याने उंड्री येथील एक रो हाऊसचे बनावट खरेदीखत तयार केले. त्या खरेदीखताचा वापर करून त्याने बँकेकडून ७० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. पारखी याने त्याच्या पदाचा गैरवापर करून कर्ज मंजूर करताना कागदपत्रे तपासली नाहीत, अशी फिर्याद देण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याचा मागणी सरकारी वकील राजश्री कदम यांनी केली. न्यायालयाने त्यांना १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.