परप्रांतीय कंटेनर चालकाला लुबाडणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:21 AM2021-09-02T04:21:06+5:302021-09-02T04:21:06+5:30
पुणे : अपघात झाल्याचा बनाव करून परप्रांतीय कंटेनर चालकाला लुटणाऱ्या तिघा चोरट्यांना कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. अतुल ...
पुणे : अपघात झाल्याचा बनाव करून परप्रांतीय कंटेनर चालकाला लुटणाऱ्या तिघा चोरट्यांना कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली.
अतुल विजय कचरावत (वय २५), प्रशांत लखन कचरावत (वय २७, दोघेही रा. सातवनगर वानवडी), शुभम शशिकांत जगताप (वय २०, रा. हांडेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या वेळी चोरट्यांकडून चोरी केलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.
या गुन्हेगारांपैकी अतुल कचरावत हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याला वानवडी पोलिसांनी तडीपार केले होते, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांनी दिली.
फिर्यादी हाकम अब्दुलमजीद (वय ५०, रा.राजस्थान) कंटेनरमध्ये माल भरून उंड्री परिसरातून जात होते. त्यावेळी तिघांनी त्यांच्या कंटेनरला चारचाकी गाडी आडवी लावून लुटले होते. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात वापरलेली गाडी प्रशांत कचरावत नावाच्या व्यक्तीकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गाडीचा पत्ता शोधून काढला. ती गाडी सातवनगर परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तिघांना गाडीसह पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस अंमलदार रमेश गुरूड, तुषार अल्हाट, ज्योतिबा पवार यांच्या पथकाने केली.