सविंदणे दरोड्यातील तिघांना अटक, पुण्यासह नगरमध्येही केल्या अनेक चो-या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 04:43 AM2017-09-25T04:43:31+5:302017-09-25T04:43:37+5:30
शिरूर तालुक्यात सविंदणे येथे मागील आठवड्यात दरोडा घालणा-या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.
टाकळी हाजी : शिरूर तालुक्यात सविंदणे येथे मागील आठवड्यात दरोडा घालणा-या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. तीन आरोपींना अटक केली आहे. पुणे व नगर जिल्ह्यात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून सराईत गुन्हेगारांना अटक केल्याने दोन्ही जिल्ह्यांतील अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांच्या पथकाने निघोज (ता. पारनेर) येथून रामदास ऊर्फ चिवड, गोपाळ काळे (वय ३५), पप्पू आलम काळे (वय २५), तसेच गुणोरे (ता. पारनेर) येथून राधेश ऊर्फ राध्या संजय काळे (वय २८) यांना शिरूर येथे सापळा रचून पकडण्यात आले. हे आरोपी जोशीवाडी शिरूर येथे मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या आरोपींनी दरोडा टाकल्याची कबुली दिली असून, त्यांच्यासोबत चार आरोपी होते.
याबाबत अधिक माहिती अशी, सविंदणे येथील फुलाबाई सुखदेव वायकर, दत्तात्रय चंदू कदम, रामदास सुदाम पडवळ यांच्या घरावर १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दरोडा टाकून १ लाख २३ हजारांचा ऐवज लुटला होता. तलवार आणि कुºहाडीचा धाक दाखवून दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी तत्काळ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाला तपासाचे आदेश दिले. गावडे यांनी शिरूर पोलीस ठाण्याला चांगले काम केले असल्यामुळे, त्यांना परिसरातील गुन्हेगारांची माहिती होतीच. पथकाने माहिती घेतली असता, त्याच दिवशी पोंदेवाडी रोडेवाडी (आंबेगाव) येथे अशोक कोंडिबा अमोडकर यांच्या घरी चोरी करून सुमारे २२ हजारांचा ऐवज लांबविला. या आरोपींनी येथून रस्त्यावरच सविंदणे येथे दरोडा टाकला. पोलिसांनी घेतलेल्या माहितीनुसार हे आरोपी मलठणवरून टाकळी हाजी कुंडमार्ग पारनेर तालुक्यात गेले. मग तपासाचे सूत्र निघोज गावाकडे वळले. पोलिसांनी कपडेवाला, फेरीवाला, तसेच विविध प्रकारे वेशांतर करून या आरोपीवर लक्ष ठेवले होते. आरोपी हे मोबाईल विक्रीसाठी शिरूर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार लक्ष ठेवून त्यांना अटक करण्यात आली.
पोलीस पथकाममध्ये सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, पोलीस हवालदार दत्तात्रय गिरमकर, राजू मोमीन, पोपट गायकवाड,
महेश गायकवाड, नीलेश कदम, समाधान नाईकनवरे यांनी चांगली कामगिरी केली.
यामधील आरोपींनी शिंदोडी (ता. शिरूर) येथील चोरीचीसुद्धा कबुली दिली आहे. हे सराईत गुन्हेगार असून त्यांची प्रचंड दहशत पुणे, नगर जिल्ह्यात आहे.