तीन हल्लेखोरांना पोलिसांनी केले जेरबंद
By admin | Published: July 6, 2017 02:57 AM2017-07-06T02:57:31+5:302017-07-06T02:57:31+5:30
कारेगाव (ता. आंबेगाव) येथे सुनील किसन घेवडे या शेतकऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांना मंचर पोलिसांनी जेरबंद केले
लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर : कारेगाव (ता. आंबेगाव) येथे सुनील किसन घेवडे या शेतकऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांना मंचर पोलिसांनी जेरबंद केले आहे. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये सर्व घटना चित्रित झाल्याने आरोपींची ओळख पटली.
या प्रकरणी शन्मुख ऊर्फ गोंड्या गणेश थिगळे (वय १८, रा. थिगळस्थळ, राजगुरुनगर), शुभम नामेंद्र मोदगेकर (वय १९, रा. स्वामीसमर्थ बिल्डींग, खेड) तसेच एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली. जमिनीच्या जुन्या वादातून हा खुनी हल्ला झाल्याचे तपासातून पुढे आले आहे.
कारेगाव येथील सुनील किसन घेवडे यांचे मृत चुलत चुलते गणपत नामदेव घेवडे यांच्याबरोबर १५ वर्षांपूर्वी वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य सबंधित तरुणांनी केल्याचे तपासात पुढे आले आहे. सुनील घेवडे पेठ येथील हॉटेलमध्ये चुलते देवराम घेवडे यांच्याबरोबर चहा पीत होते, त्या वेळी त्यांना मोबाईलवर फोन आला होता. शन्मुख ऊर्फ गोंड्या, गणेश थिगळे व इतर दोघे पेठ येथील चौकात आले. त्याने सुनील घेवडे यांना ‘दुचाकीवर बस व कारेगावला चल,’ असा सज्जड दम भरला. कारेगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर दुचाकी थांबवून शन्मुख ऊर्फ गोंड्या गणेश थिगळे याने ‘बऱ्याच वर्षांपूर्वी माझे आजोबा गणपत नामदेव घेवडे यांच्याबरोबर भांडणे केली होती ना? आता तुला जिवंत सोडणार नाही,’ असे म्हणून त्याच्या कंबरेला असलेला सुरा काढून सुनील घेवडे यांच्यावर वार केले.
घेवडे यांच्या तोंडावर, डोक्यावर, हातावर, पोटावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. मंचर पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.