शिवाजीराव भोसले बँकेच्या तीन शाखा व्यवस्थापकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:08 AM2021-07-05T04:08:14+5:302021-07-05T04:08:14+5:30
वडगाव शेरी शाखेचे गोरख महादेव दोरगे, तर औंध शाखेचे प्रदीप सहदेव निम्हण आणि कोथरूड शाखेचे नितीन मारुतराव बाठे या ...
वडगाव शेरी शाखेचे गोरख महादेव दोरगे, तर औंध शाखेचे प्रदीप सहदेव निम्हण आणि कोथरूड शाखेचे नितीन मारुतराव बाठे या तीनही व्यवस्थापकांनी बांदला यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर केल्याचे दिसून आले आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी मंगलदास बांदल यांच्याविरोधात दत्तात्रेय रावसाहेब मांढरे ,रवींद्र सातपुते, मंदार पवार यांच्या तक्रारीवरून तीन गुन्हे दाखल झाले होते. हे सर्व गुन्हे शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या फसवणूक प्रकरणातून दाखल झाले आहेत.
वडगाव शेरी (पुणे) येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत तत्कालीन शाखाधिकारी म्हणून गोरख महादेव दोरगे, तर औंध शाखेत प्रदीप सहदेव निम्हण आणि कोथरूड शाखेत नितीन मारुतराव बाठे आदी तिघेजण कार्यरत होते. याच काळात बांदल यांच्या तीनही प्रकरणांत कर्जमंजुरी देताना अनियमितता झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. प्रदीप निम्हण, नितीन बाठे व गोरख दोरगे या तिघांनीही आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट झाल्याने शिक्रापूर पोलिसांनी या तिघांनाही शुक्रवारी (ता. २ जुलै) तपासकामी बोलावून त्यांना अटक केल्याचे शिक्रापूर पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. या तीनही प्रकरणांचा तपास योग्य पध्दतीने सुरू असून पुढील कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.