गोडबोले कुटुंबातील तिघा भावांचे कोरोनामुळे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:10 AM2021-04-25T04:10:46+5:302021-04-25T04:10:46+5:30
पुणे : शहरात एकाच कुटुंबातील अनेक सदस्य कोरोनामुळे दगावत असल्याचे सुन्न करणारे चित्र पाहायला मिळत आहे. अशीच एक मन ...
पुणे : शहरात एकाच कुटुंबातील अनेक सदस्य कोरोनामुळे दगावत असल्याचे सुन्न करणारे चित्र पाहायला मिळत आहे. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जुन्या व प्रथितयश गोडबोले कुटुंबातील विश्वनाथ, अरविंद आणि डॉ. रमेश गोडबोले या तिघा भावांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले. ही गोष्ट पुणेकरांच्या मनाला चटका लावून गेली आहे. खरंतर वडील नीलकंठ बापू गोडबोले सराफ यांनी वयाची शंभर वर्षे पार करून निरोगी दीर्घायुष्याचा आदर्श समाजापुढे ठेवला होता. मात्र, मुलांना दीर्घायुष्य लाभू शकले नाही याविषयी हळहळ व्यक्त करण्यात आली.
विश्वनाथ ऊर्फ दादा गोडबोले (वय ९०) यांचा वडिलोपार्जित सोने-चांदी सराफीचा व्यवसाय. हिरे आणि नवरत्न हे त्यांचे अभ्यासाचे विषय राहिले. मध्यमवर्गीयांसाठी कमी वजनात हिऱ्याचे व नवरत्नांचे दागिने कसे बनतील यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. रुग्णोपयोगी साहित्य त्यांनी अल्प भाड्यात उपलब्ध करून दिले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा सर्जन रघुनाथ गोडबोले, मुलगी विनया बापट, सून, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. नातू मिहिर सराफीचा व्यवसाय पुढे चालवत आहे.
अरविंद गोडबोले (वय ८६) यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी संपादन केली. जर्मन सरकारची शिष्यवृत्ती मिळवून पुढील शिक्षणासाठी दोन वर्षे जर्मनीला गेले. मातृभूमीच्या प्रेमाच्या ओढीने भारतात परतल्यावर त्यांनी ३२ वर्षे किर्लोस्कर कमिन्समध्ये नोकरी केली. जर्मन भाषेची पदविका पूर्ण करून त्यांनी तत्कालीन पुणे विद्याापीठात २० वर्षे जर्मन भाषेचे अध्यापन केले. भारत-चीन युद्धाच्या काळात १९६२ मध्ये त्यांनी साधेपणाने विवाह करून विवाहासाठी होणाऱ्या अपेक्षित खर्चाची सर्व रक्कम युद्ध सहाय्य समिती निधीमध्ये जमा केली होती. १९९६ मध्ये त्यांनी उत्सव सभागृह हे मंगल कार्यालय बांधले. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनीसाठी दर वर्षी त्यांनी पारितोषिक ठेवले आहे. त्यांच्यामागे विमा व गुंतवणूक सल्लागार अनिता आपटे ही मुलगी आणि सराफ व्यावसायिक सुजय हा मुलगा असा परिवार आहे.
डॉ. रमेश गोडबोले (वय ८०) हे डॉ. गोडबोले लॅबोरेटरीचे संचालक, डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेचे कार्यवाह होते. ‘मधुमित्र’ मासिकाचे ३० वर्षे संपादक होते. डॉ. गोडबोले ‘निसर्गसेवक’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष होते. स्मृतिवन आणि स्मृती उद्यान हे दोन वनीकरण प्रकल्प पूर्ण करण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. त्यांनी ‘लढा साखरेशी’ आणि ‘मधुमेही गीता’ या पुस्तकांचे लेखन केले. मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार आणि वनमित्र पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्यामागे दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
................................