पुणे मेट्रोला गुणवत्तेची तीन प्रमाणपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:11 AM2021-03-06T04:11:25+5:302021-03-06T04:11:25+5:30
पुणे : शहरातील मेट्रो प्रकल्पाला गुणवत्तेची तीन आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे मिळाली. मेट्रो प्रकल्पात जागतिक दर्जाच्या गुणवत्तेचे काम सुरू असल्यावर यामुळे ...
पुणे : शहरातील मेट्रो प्रकल्पाला गुणवत्तेची तीन आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे मिळाली. मेट्रो प्रकल्पात जागतिक दर्जाच्या गुणवत्तेचे काम सुरू असल्यावर यामुळे शिक्कामोर्तब झाल्याचा दावा महामेट्रो प्रशासनाने केला.
वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट अशा ३१ किलोमीटरच्या २ मार्गांवर मेट्रोचे काम सुरू आहे. यातील शिवाजीनगर ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा मार्ग भुयारी आहे. मागील ३ वर्षांपासून हे काम सुरू असून ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामांचा दर्जा, कामगारांचे आरोग्य व पर्यावरण संवर्धन अशा तीन स्तरावर आंतरराष्ट्रीय मानांकन देणाऱ्या संस्थेकडून तपासणी केली गेली. महामेट्रोने तशी मागणी केली होती.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तेचे निकष लावून मेट्रोचे प्रत्येक काम तपासले गेले. महामेट्रोने बांधकाम तसेच अन्य कामांसाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता नियंत्रक प्रणाली तयार केली आहे. ते निकष लावून प्रत्येक काम केले जाते. त्याशिवाय ही कामे सुरू असताना पर्यावरणाची कसलीही हानी होऊ नये यासाठी खास काळजी घेतली जाते. कामात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या पुनर्रोपणापासून ते नव्याने वृक्ष लागवड करण्यापर्यंत अनेक कामे मेट्रो करत आहे.
कामगारांची सुरक्षितता सांभाळण्याबरोबरच त्यांच्यासाठी आरोग्य सुविधा देण्याचे कामही मेट्रोकडून प्राधान्याने करण्यात येते. या सर्व गोष्टींची तपासणी होऊन महामेट्रोला तिन्ही कामांसाठी गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात आले. महामेट्रोचे व्यवस्थाकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले की कामांबाबत महामेट्रो गुणवत्ता व काळजी दोन्हीकडे लक्ष देत असल्यावर हे शिक्कामोर्तबच आहे.