Pune: वडगावमधून तीन लहान मुले झाली बेपत्ता, परिसरात मोठी खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 05:17 PM2023-11-03T17:17:11+5:302023-11-03T17:19:43+5:30
सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपास केला जात आहे...
वडगाव मावळ (पुणे) : माळीनगरमधून तीन लहान मुले अचानक बेपत्ता झाली आहेत. याबाबत वडगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथके वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपास करत बेपत्ता मुलांचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपास केला जात आहे.
स्वाती विजय रसाळ (वय ३० वर्षे, रा. माळीनगर) यांनी वडगांव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ३१ ऑक्टोबर रोजी स्वाती रसाळ या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमास गेल्या होत्या. लहान मुले खेळावयास बाहेर गेली होती. वडगाव येथील माळीनगर, शिक्षक सोसायटीसमोर झोपडीत राहणाऱ्या दोन मुली व एक मुलगा अचानक बेपत्ता झाले. या मुलांचा सर्वत्र शोधाशोध केला. मात्र कुठेही सापडले नाहीत. स्वाती रसाळ यांनी वडगांव पोलिसांत धाव घेतली. रात्री ८ वाजता कु. प्रेम शरद हिवराळे (वय १३) कु. भाग्यश्री शरद हिवराळे (वय ११ ), प्रेरणा शरद हिवराळे (९) यांचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुनील जावळे, हवालदार सचिन गायकवाड, सचिन देशमुख, संजय सुपे यांच्यासह पोलिस पथकाने युद्ध पातळी तपास सुरू केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते करीत आहेत.